Rohit Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यामध्ये शाब्दिक वाद, आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. याचाच पुढील अंक म्हणजे आता रोहित पवार यांनी थेट अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी राजकारणातून बाहेर जावं, अशी म्हणायची हिंमत अजित पवार यांच्यामध्ये आहे का ? असा घणाघात रोहित पवार यांनी केलाय. ते कर्जत, अहमदनगरमध्ये बोलत होते. 


अजित पवारांमध्ये ती हिम्मत आहे का? 


रोहित पवार यांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित अजून बच्चा असल्याचं म्हणत उपरोधिक टीका केली होती. यावर रोहित पवार यांनी देखील "बच्चे मन के सच्चे" असं म्हणत अजित पवारांसाठी मी बच्चाच आहे. कारण ते माझे काका आहेत. पण अजितदादा नेहमी सगळ्यांच्या वयावर बोलतात, कधी ते मला बच्चा म्हणतात तर कधी ते पवार साहेबांचं वय झालं म्हणतात. मात्र ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयावर कधी बोलत नाहीत.काही वर्षांत मोदी 80 वर्षांचे होतील, मग त्यांनी राजकारणातून बाहेर गेलं पाहिजे अशी म्हणण्याची हिम्मत त्यांच्यात आहे का ? असा घणाघात रोहित पवारांनी केला.


...म्हणून जवळच्या लोकांमध्ये आम्ही रेष ओढली-रोहित पवार


आमदार रोहित पवार यांना ईडीने नोटीस पाठवली, त्यांच्या कारखान्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस पाठवली, या सर्व कारवाया युवा संघर्ष यात्रेत सरकार विरोधी भूमिका घेतल्यामुळेच झाल्याचे रोहित पवार म्हणाले. या कारवाया करतांना घरातील जवळच्या व्यक्तींचा समावेश होता का? या प्रश्नांला उत्तर देताना रोहित पवारांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला.जवळचे लोक पण असतात, पण राजकारण म्हटलं की कुठेतरी एक रेष ओढावी लागते. ती आम्ही ओढली आहे, रोहित पवारांनी म्हटले आहे. 


राधाकृष्ण विखे पाटलांवर सडकून टीका - 


तलाठी भरतीवरून सध्या राज्यांमध्ये प्रचंड गोंधळ उडाल्याचा पाहायला मिळत आहे. तलाठी भरती वरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. या भरतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता.तर ही भरती पारदर्शक पद्धतीने झाली आहे, जर कोणी अशा पद्धतीने सरकारची बदनामी करत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असा इशारा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला होता, याबाबत माझाशी बोलताना आमदार रोहित पवार यांनी राधाकृष्ण विखे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. विखे पाटलांच्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना 200 पैकी 214 गुण ते देणार का? आणि कुणालाही डॉक्टर करणार का? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला आहे. त्याचबरोबर शिक्षक भरती वरून देखील त्यांनी सरकारला घेरलं आहे.