Vinod Kambli Job : आर्थिक अडचणीत सापडलेल्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) यांना अहमदनगरचे उद्योजक संदीप थोरात यांनी दरमहा एक लाख रुपयांच्या नोकरीची ऑफर दिली होती. ही ऑफर विनोद कांबळी यांनी नुकतीच स्वीकारली आहे. याबाबत सह्याद्री मल्टिस्टेटचे चेअरमन संदीप थोरात यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. सह्याद्री मल्टिस्टेट फायनान्स  कंपनीच्या मानद संचालकपदाची धूरा कांबळींवर सोपविण्यात आली आहे.


काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी आपल्या हालाखीच्या आर्थिक परिस्थितीबाबत केलेलं  वक्तव्य अहमदनगरचे उद्योजक संदीप थोरात यांच्या पाहण्यात आले.देशासाठी खेळलेल्या खेळाडूवर अशी परिस्थिती ओढवल्याने आपण त्यांना ही ऑफर दिल्याचे संदीप थोरात यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले होते.सोबतच क्रिकेट हा मॅनेजमेंटचा खेळ आहे आणि एखाद्या फायनान्स कंपनीत ही मॅनेजमेंट खूप महत्वाचे असते त्यामुळे कांबळी यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा आमच्या कंपनीला फायदाच होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांनी गुरुवारी मुंबईत जाऊन कांबळी यांची भेट घेतली आणि आपली ऑफर त्यांना सांगितली.विनोद कांबळी यांनीही ही ऑफर स्वीकारत संदीप थोरात यांचे आभार मानले.दरम्यान थोरात यांनी तात्काळ कांबळी यांना एक लाख रुपयांचा चेक प्रदान केला.


एकेकाळी क्रिकेटचे मैदान गाजवणारे विनोद कांबळी आता सह्याद्री मल्टिस्टेट फायनान्स कंपनीच्या मानद संचालक पदी दिसणार आहेत.त्यांच्यासाठी ही नवीन कारकीर्द असणार आहे.मुंबई येथील शाखेची जबाबदारी ते यापुढे सांभाळतील अशी माहिती थोरात यांनी दिली आहे.सोबतच ज्यांचे क्रिकेट पाहून आम्ही प्रभावित झालो त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा मनस्वी आनंद होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


विनोद कांबळीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
विनोद कांबळीनं आपल्या कारकिर्दीत भारतासाठी 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या 1 हजार 84 धावा आणि कसोटीत 2477 धावा आहेत. लहानपणी तो सचिनसोबत क्रिकेट खेळायचा. त्यानं आपल्या कारकिर्दीची सुरुवातही दमदार पद्धतीनं केली. पण नंतर तो आपला फॉर्म कायम राखू शकला नाही आणि संघाबाहेर बाहेर पडावं लागलं.


हे देखील वाचा-