अहमदनगर : नृत्यांगना गौतमी पाटीलला जामीन मंजूर झाला आहे. अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला आहे. विनापरवाना कार्यक्रम करून नियमांचं उल्लंघन केल्यावरून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने अटी आणि शर्तीनुसार हा जामीन मंजूर केला आहे.


गेल्या वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी पाईपलाईन रोडवर गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमासाठी तिने परवानगी घेतली नसल्याचं समोर आलं. विनापरवानगी कार्यक्रम घेत नियमांचं उल्लंघन केल्यामुळे गौतमी पाटीलवर पोलिसांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.


गेल्या वर्षी गणपतीच्या दरम्यान रस्त्यावर मंडप टाकून रहदारीस अडथळा होईल अशा प्रकारे नृत्यांगना पाटील हिचा कार्यक्रम घेतल्याबद्दल नगरमधील गणपती मंडळाच्या अध्यक्षांसह गौतमी पाटील आणि तिच्या मॅनेजर विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


गणेशोत्सवाच्या काळात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन तिच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देऊन परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतरही गौतमीचा कार्यक्रम झाल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


काय आहे प्रकरण?


नगर शहरातील पाईपलाईन रोडवर गुरूवारी सायंकाळी मृत्युंजय प्रतिष्ठान आणि एकदंत मित्र मंडळ यांच्यावतीने गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास प्रशासनाने परवानगी नाकारली  होती. मात्र तरीही हा कार्यक्रम घेतल्यामुळे पोलिसांनी आता गौतमी पाटील, तिचा स्वीय सहाय्यक अशोक खरात आणि कार्यक्रमाचे आयोजक असलेले मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल सांगळे, आनंद कैलास नाकाडे, हर्षल किशोर भागवत, यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये रस्त्यात अडथळा निर्माण होईल असा कार्यक्रम घेणे तसेच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीक्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादवी कलम 188,283,341, 34 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 2,15 आणि ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 चे कलम 3,4 5, 6 आणि मु.पो.का.क 37 (1) (3)/135  प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.