अहमदनगर : दुधाला (Milk) 40 रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी अकोले (Akole) तालुक्यातील गणोरे गावात शुभम आंबरे (Shubham Ambare) आणि संदिप दराडे (Sandip Darade) या शेतकरी पुत्रांचे गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषण (Hunger Strike) सुरु होते. आज दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी उपोषण स्थगित केले. दुधाला हमीभाव देण्यासाठी पावले उचलण्याचे आश्वासन विखे पाटील यांनी दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण स्थगित केले.
या आंदोलनाबाबत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, दुधाच्या व्यवसायात अनिश्चितता आहे. जागतिक बाजार पेठेत भुकटीचे भाव पडल्याने निर्यात बंद आहे. मागणीपेक्षा दुधाचे उत्पादन जास्त आहे. अनेक कारणांनी दुधाचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने अनुदानासह 35 रुपये भावाचा निर्णय घेतला आहे. हमीभावासाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दुधासाठी एमएसपी कायदा करण्याची मागणी केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
तीन दिवसांपासून निलेश लंकेंचे आंदोलन सुरु
तर, कांदा (Onion) आणि दुधाला (Milk) योग्य भाव मिळावा, या मागणीसाठी खासदार निलेश लंके (Nilesh lanke) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) शेतकरी जनआक्रोश आंदोलन तीन दिवसांपासून सुरु आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ (Siddharam Salimath) यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी आंदोलनस्थळी यावं, अशी भूमिका खासदार निलेश लंके यांची आहे. निवासी उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांनी आंदोलकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आंदोलन स्थळी भेट दिली होती. मात्र निलेश लंके हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. निलेश लंके यांच्या आंदोलनावर नगरचे पालकमंत्री आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
आवश्यकता वाटल्यास निलेश लंकेंशी चर्चा करण्याची माझी तयारी
निलेश लंके यांच्या आंदोलनाबाबत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. निलेश लंके खासदार म्हणून आंदोलन करताय यात काही वावगं नाही. त्याला राजकीय रंग देण्याची माझी भूमिका नाही. आवश्यकता वाटल्यास निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता निलेश लंके यांच्या आंदोलनावर काय तोडगा निघणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा