कोपरगाव: आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आणि नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच काही जागांसाठी देखील मोठे पेच निर्माण झाले आहेत. असे पेच सोडवताना आता पक्षांची मोठी डोकेदुखी होणार आहे. अशातच कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा पेच सोडवण्यासाठी स्वत: भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हेंना त्यांनी चर्चेसाठी बोलावले आहे.


भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हेंना देवेंद्र फडणवीसांनी चर्चेसाठी निमंत्रण दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीत असल्याने कोल्हेंची राजकीय कोंडी निर्माण झाली आहे. स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे (Vivek Kolhe) कोपरगाव विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. मात्र, या विधानसभा निवडणुकीमध्ये ही जागा अजित पवार गटाकडे जाणार असल्याने राजकीय कोंडी निर्माण झाल्याचं चित्र आहे. 


विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी काही दिवसांपुर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. कोपरगावचा पेच सोडवण्यासाठी फडणवीसांकडून मोठे प्र‌यत्न सुरू आहेत. स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांनी पक्षातच रहावे यासाठी फडणवीसांचे प्रयत्न सुरू आहेत. विवेक कोल्हे आणि स्नेहलता कोल्हे काय निर्णय घेतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. 


विवेक कोल्हेंनी घेतली होती शरद पवारांची भेट


विवेक कोल्हे आणि शरद पवार यांची काही दिवसांपुर्वी भेट झाली होती, त्यांनी  एकाच गाडीतून प्रवास केल्याची माहिती समोर आली  होती. कोपरगावमध्येही मतदारसंघावरून आणि जागेवरून धुसफूस पाहायला मिळत आहे. विद्यमान आमदार आशुतोष काळे (Ashotosh Kale) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) काही दिवसांपूर्वीच आशुतोष काळे यांनी उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे भाजप नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) कोडींत सापडले आहेत. आता विवेक कोल्हे राष्ट्रवादी शरद पवार गटात (NCP Sharad Pawar Group) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले.


विवेक कोल्हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक 


विवेक कोल्हे हे सहकारातील दिग्गज नेते शंकरराव कोल्हे यांचे नातू आहे. तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपूत्र आहेत. विवेक कोल्हे यांनी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात (Nashik Teachers Constituency Election) नशिब अजमावण्याचा प्रयत्न केला होता. या निवडणुकीत त्यांनी किशोर दराडे त्यांना तगडे आव्हान दिले होते. आता विवेक कोल्हे हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.