Ahmednagar News Live Updates: राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबद्दल असं वक्तव्य करायला नको होतं, विशेष म्हणजे त्यांनी स्वतःच सभागृहात असं म्हटलं होत की कुणीही महापुरुषांबद्दल चुकीची विधानं करू नये आणि त्यांनीच असं वक्तव्य केलं. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार छत्रपती संभाजी महाराज जर धर्मवीर नसतील तर भाजपातर्फे अजित पवारांना 'धरणवीर' पुरस्कार देणार असल्याची खरमरीत टीका भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे.
अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आल्याबाबत त्यांना विचारले असता, आतापर्यंत अहमदनगरच्या स्थानिकांकडून नामांतराची मागणी झाल्याचे माझ्या ऐकिवात नाही, अहमदनगरची जनता जोपर्यंत अशी मागणी करत नाही तोपर्यंत जिल्ह्याबाहेरच्या एखाद्या व्यक्तींनी अशी मागणी करणं मला संयुक्तिक वाटत नाही असं खासदार विखे म्हणाले. महापालिकेत जो काही ठराव होईल त्यासोबतच आम्ही राहू असंही खासदार विखे म्हणाले.
नोटबंदीच्या निर्णय हा भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याकडे पहिलं पाऊल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला नोटबंदीच्या निर्णय हा भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याकडे पहिलं पाऊल होतं, या निर्णयानंतर काही सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे काही अडचणी आल्या मात्र तरीही पुन्हा भाजपचं सरकार आलं. याचाच अर्थ जनतेने नोटबंदीचा निर्णय खुल्या दिलाने स्वीकारला. काही लोकांनी निवडणुकीसाठी साठवलेला पैसा त्यांना जाळावा लागला, त्यामुळे त्यांनी वेगळ्या मानसिकतेतून काही लोकांना न्यायालयात पाठवले. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या विषयावर पडदा पडेल आणि विरोधकांना नवीन मुद्दा शोधण्याची गरज असल्याचे खासदार सुजय विखे पाटील म्हणाले.
अजित पवार यांच्या बारामतीतील (Baramati) निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला
अजित पवार यांच्या बारामतीतील (Baramati) निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. अजित पवारांच्या सहयोग सोसायटीबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. संभाजी महाराज हे धर्मवीर (Dharmaveer) नव्हते ते स्वराज्य रक्षक (Swarajya Rakshak) होते, असं अजित पवार विधानसभेतील भाषणात म्हणाले होते. त्यावरुन भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बारामतीत अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला (Baramati Protest against Ajit Pawar) दरम्यान, बारामतीतच अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. नागपूर अधिवेशनादरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक असा उल्लेख केला होता. भाजपच्यावतीने भिगवन चौकात (Bhigwan) आंदोलन करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
अजित पवारांविरोधात भाजपायुमोचं आंदोलन
अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दलच्या वक्तव्याविरोधात अमरावतीत भाजपा युवा मोर्चानं आंदोलन केलं. राजापेठ उड्डाणपूलावर घोषणाबाजी करत निषेध केला गेला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या फोटोला चपला मारून, बॅनर फाडून निषेध केला.
ही बातमी देखील वाचा