अहमदनगर: भाजपच्या सुजय विखेंच्या (Sujay Vikhe Patil) विरोधात आता राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके (Ranitai Lanke) निवडणूक लढवणार अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे वेगवेगळ्या कार्यक्रमात त्यांचे बोर्ड झळकायला सुरूवात झाली आहे. तसेच एकाच घरात दोन मतप्रवाह असू शकतात असं सूचक वक्तव्य निलेश लंके यांनी केलंय. त्यामुळे राणीताई लंके यांनी लोकसभेची तयारी सुरू केली असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. 


सध्या भाजप आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट हा महायुतीत सत्तेत आहे. मात्र तरी देखील कधी निलेश लंके तर कधी राणीताई लंके यांच्या लोकसभा उमेदवाराची उमेदवारीची चर्चा रंगत असते. याबाबत बोलताना स्वतः राणीताई लंके यांनी हे बॅनर कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत, त्यांच्या मनात ज्या भावना आहेत त्याचा नक्कीच विचार होईल. पण पक्षश्रेष्ठींचा विचार घेऊनच पुढे निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलं आहे.


राम शिंदेही लोकसभेच्या मैदानात? 


या आधी भाजपच्या राम शिंदे यांनीही आपल्याला पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू असं वक्तव्य केलं होतं. सध्या नगर जिल्ह्यातल्या भाजपमध्ये अंतर्गत मतभेत असल्याचं चित्र आहे. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत विखे पाटलांच्यामुळे आपला पराभव झाल्याचं मत राम शिंदे यांचं आहे. त्यामुळे राम शिंदे यांनीही विखेंवर वेगळ्या माध्यमातून दबाव टाकायला सुरूवात केल्याची चर्चा आहे. 


अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना देखील बाहेरच्या उमेदवारांना ऐवजी दक्षिणेकडील एखाद्या नेत्याने उमेदवारी करावी अशी अपेक्षा आहे. कारण दक्षिण नगर जिल्हा हा अवर्षणप्रवण जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि उत्तरेकडून येणारे नेते हे दक्षिणेकडील दुष्काळी भागात लक्ष घालत नाहीत अशी चर्चा कायमच रंगलेली असते.


सध्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या बॅनरवर आमदार निलेश लंके यांची पत्नी राणीताई लंके यांचे फोटो झळकायला सुरुवात झाली आहे. त्यातल्या त्यात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यात त्यांचे बॅनर्स झळकू लागले आहेत. त्यामुळे येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत त्या उमेदवारी मिळवू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागले आहे.


अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटादेवीकडे जाणाऱ्या महिला भाविकांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून मोहटादेवीकडे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या भाविकांच्या स्वागतासाठी अनेक नेत्यांचे बॅनर हे रस्त्याच्या कडेला लागलेले आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांची पत्नी राणीताई लंके यांच्या फोटो असलेला बॅनर देखील ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यातच राणीताई लंके यांचे पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, राहुरी या तालुक्यांमध्ये दौरे वाढले आहेत.


ही बातमी वाचा: