Deepak Kesarkar On Ajit Pawar : "अजित पवार (Ajit Pawar) कार्यक्षम नेते असून त्यांनी आमच्यासोबत यावं," अशी खुली ऑफर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) दिली आहे. तसंच राष्ट्रवादीत त्यांच्याबाबत काय होतंय हे सर्वांना माहित असल्याचंही ते म्हणाले. दीपक केसरकर हे निस्सीम साईभक्त असून वर्षभरात अनेक वेळा साईंच्या दर्शनाला हजेरी लावतात. आज सकाळी केसरकर यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे.


'दंगल होणार हे नेत्यांना अगोदर कसं कळतं?'


राज्यात दंगली घडवून आणण्याचे प्रयत्न होत असल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी कोल्हापुरातील राड्याबाबत केलं होतं. यावर टीका करताना दीपक केसरकर म्हणाले की, "दंगली करणारे सत्तेवर बसले तर दंगली होणारच नाहीत. त्यांनी दंगली केल्या असं मी म्हणत नाही. कोल्हापुरात जी दंगल घडली त्यात एकही माणूस शहरातील नव्हता. बाहेरुन आलेले होते. दंगल होणार हे नेत्यांना अगोदर कसं कळतं? सामाजिक ऐक्य राखणं सर्वांचंच काम आहे. तुम्ही दंगली भडकवणार आणि आमच्या आरोप करणार हे चालणार नाही."


'दादांनी सरकारमध्ये यावे ही आमची अपेक्षा'


दीपक केसरकर पुढे म्हणाले की "अजित पवार यांच्याबद्दल मला अतिशय आदर आहे. दादा विरोधी पक्षाचे नेते, जबाबदार नेते आहेत. त्यांनी अशी वक्तव्ये करु नये. संजय राऊत यांच्यासारखे लोक रोज बोलतात त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. मात्र दादा जेव्हा बोलतात ते जनता त्याला गांभीर्याने घेते. सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये दादा आमच्याबरोबर आघाडीवर असतील याची मला खात्री आहे."


"दादांनी पण सरकारमध्ये यावे ही आमची अपेक्षा आहे. दादा हे कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्या कामाचा फायदा हा राज्यातील जनतेला झाला पाहिजे. राष्ट्रवादीमध्ये त्यांच्यासोबत काय होतंय हे सर्वांना माहित आहे," अशा शब्दात दीपक केसरकर यांनी अजित पवार यांना सरकारमध्ये येण्यासाठी ऑफर दिली


संजय राऊतांसह ठाकरे गटावर हल्लाबोल


आपल्याच माणसाला धमकी द्यायला लावतात. ही कशी लोक आहेत, यांचे बुरखे आपोआप फाटले ‌जात आहेत. ते किती घाणेरड बोलतात हे आपण समजून घेतलं पाहिजे.
त्यांच्या पक्षाने नवीन काहीतरी चॅनल सुरु केलं आहे. त्यात राऊतांना घेतलं नाही. सुषमा अंधारे यांना घेतलं आहे. त्या बाळासाहेबांबद्दल काय बोलल्या अन् त्यांना प्रवक्ता केलं.
आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे आहोत. त्यांनी ते विचार सोडले, अशा शब्दात केसरकर यांनी संजय राऊत आणि ठाकरे गटावर हल्लाबोल केला. 


आदित्य ठाकरेंवर टीका


आदित्या ठाकरेंवर टीका करताना केसरकर म्हणाले की, आदित्य ठाकरेंना कोणी अधिकार दिला खोके घेतले म्हणण्याचा? कोर्टाने नोटीस ‌दिली तेथे जाऊन उत्तर द्या. पैशांनी कोणी विकल जात नाही. ते खोट बोलतात, बाळासाहेब नेहमी खर बोलायचे. तरुण असून तुम्ही मंत्रालयात जात नव्हता. पर्यटनमंत्री असताना आदित्य ठाकरेंनी कोकणासाठी काय केल? लोकांना भडकावून पोळी भाजून घ्यायची"


तुम्ही शिवसैनिकांची तुलना बेडकाशी करत आहात. त्यामुळेच तुमचं नावही गेलं अन् चिन्हही गेलं. एकनाथ शिंदे गरजवंताना मदत करणारे आहेत. जे बाळासाहेब करायचे ते शिवसैनिक करत आहेत. पंतप्रधान मोदी उद्धव ठाकरेंना जवळ घ्यायला तयार होते अन् तुम्ही खोट बोलत फिरत आहात, असा दावा केसरकर यांनी केला.


आम्हाला मंत्रिपद मिळेल


केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, "100 टक्के आम्हाला मंत्रिपद मिळेल. काही खाते रिक्त आहेत त्याचा विचार होईल. कोणतं खात मिळेल हे मोदी ठरवतील मात्र जी संधी मिळेल त्याचा महाराष्ट्रासाठी उपयोग करु."


पहिल्या टप्प्यात तीस हजार शिक्षकांची भरती करणार


पहिल्या टप्प्यात तीस हजार शिक्षकांची भरती करणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं. काही दिवसांचा प्रश्न आहे. सर्वत्र शिक्षक देऊ. आधार कार्डचं व्हेरिफिकेशन सुरु आहे. पूर्ण झाल्यानंतर पन्नास हजार शिक्षकांची भरती करणार आहे. ग्रामीण भागात तरुणांना संधी देणार, असं केसरकर म्हणाले.