Ahmednagar Success Story: गवंडी काम करणारे वडील, शिवणकाम करणारी आई, घरची परिस्थिती हलाखीची असताना अहमदनगरच्या विशाल पवारने यूपीएससीची (UPSC) सीडीएस (Combined Defence Services Examination) परीक्षा उत्तीर्ण केली. 10 बाय 10 च्या खोलीत अभ्यास करणारा विशाल लवकरच भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर नियुक्त होणार आहे. देहारादून येथे 18 महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन विशाल देश सेवेत रुजू होणार आहे.


बुरूडगाव येथे 10 बाय 10 च्या खोलीत वडील राजेंद्र, आई सुनीता आणि आपल्या आजीसह विशाल कुटुंबासोबत राहात आहे. विशालने प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवले. विशालच्या या यशाबद्दल त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. विशालचे पहिले ते चौथीचे प्राथमिक शिक्षण हे बुरूडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर 10 वी पर्यंतचं शिक्षण अहमदनगरच्या रुपीबाई बोरा विद्यालयात झाले.


अहमदनगरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये त्याने मॅकेनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे कोणतेही महागडे क्लासेस लावणे विशालला शक्य नव्हते. वडील सेंटरिंग काम करतात तर आई शिवणकाम करते. त्यामुळे कुटुंबावर आपल्या शिक्षणाचा भार नको म्हणून विशालने एक वर्ष खासगी कंपनीत नोकरी केली. त्यातून पैसे जमा करून पुण्याच्या काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. पदवीचे शिक्षण सुरू असतानाच त्याने यूपीएससीची तयारी सुरू केली. मात्र पहिल्या प्रयत्नात विशालला अपशय आलं. मात्र विशालने 10 एप्रिल रोजी पुन्हा सीडीएसची परीक्षा दिली. यामध्ये त्याला यश मिळालं. सप्टेंबर महिन्यात बेंगलोर येथे त्याची मुलाखत झाली. त्यातही विशालने यश मिळवलं. पुढे मेडीकल आणि इतर सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर मागील आठवड्यात निकाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात आर्मीसाठी त्याचा देशात टॉप 100 मध्ये 61 वा नंबर आला आहे.तर नेव्हीसाठी टॉप शंभर मध्ये 20 वा नंबर आला आहे.


अगदी लहानपणापासूनच आर्मीत जाण्याचे विशालचे स्वप्न होते. त्यामुळे त्याने आर्मीला प्राधान्य दिलं आहे. त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी अभिमान वाटत असल्याचे ग्रामस्थ जालिंदर वाघ यांनी म्हटलं आहे. तर मुलाने प्रतिकुल परिस्थिती कोणताही हट्ट न करता दररोज 10 तास अभ्यास करून हे यश मिळवल्याने अतिशय अभिमान वाटत असल्याचे विशालचे वडील राजेंद्र पवार आणि सुनीता पवार यांनी म्हंटलं आहे. त्यातच त्याने देशसेवेचीच निवड केल्याने आपल्याला अधिक अभिमान वाटत असल्याचे त्याच्या पालकांनी म्हंटलं आहे. तर कोरोनाच्या लॉकडाऊन काळात मिळालेल्या वेळेमुळे आपल्याला अधिक फायदा झाल्याचे म्हणत, आई वडिलांच्या डोळ्यातील आनंद पाहून मन भरून येत असल्याचे विशालने म्हंटले आहे. सध्या विशालवर जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.