Ahmednagar Shirdi Latest News update : माजी महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आज संगमनेर तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा झाला. वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे शिवारात समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांच्या उपस्थितीत काल्याच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे आणि बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात उपस्थित होत्या. त्यांनीनी इंदुरीकर महाराज यांच्या उपस्थितीत बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचा केक कापत आनंद उत्सव साजरा केला. संगमनेरमध्ये सध्या याची चर्चा सुरु आहे. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कर्यक्रमात आज सत्यजित व जयश्री यांच्या भाषणाची चर्चा रंगली होती.
संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे शिवारात आज बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. बाळासाहेब थोरात आजारी असल्याने ते या कार्यक्रमास उपस्थित नव्हते. नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे, जयश्री थोरात यांनी या कीर्तन सोहळ्यात हजेरी लावत वाढदिवस साजरा केला. बाळासाहेब थोरात यांनी थेट मुंबईहून व्हिडिओ संदेश पाठवत सर्वांचे आभार मानले.
जयश्री थोरात काय म्हणाल्या?
काल्याच्या कीर्तनानंतर इंदुरीकर महाराज यांना सत्कारासाठी बोलावले असता त्यांनी मी घरचाच आहे, आधी नवीन आमदारांचा सत्कार कसा करा असं सांगितलं. त्यानंतर सत्यजित तांबे यांचा सत्कार केला. सत्कारानंतर बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी उपस्थिंताशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, मी गेल्या अनेक महिन्यात इतक्या सप्ताहांमध्ये भाषण केली की आता साहेबांना ही काळजी वाटायला लागली माझी पोरगी प्रवचनकार होते की काय. जयश्री यांच्या या वक्तव्यानंतर एकच हशा उडाला होता. तर यावेळी जयश्री थोरात यांनी महिलांना कॅन्सर पासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं…
सत्यजित तांबे काय म्हणाले?
एकवेळ अशी होती की राजकारणातील नेते मंडळी दिशा ठरवायचे आणि लोक त्यांचे बघून पुढचं काम करायचे. मात्र आता जमाना बदललाय. लोकांना जे आवडतं ते नेत्यांना करावं लागतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असं वक्तव्य सत्यजित तांबे यांनी यावेळी व्यक्त केलं. जयश्रीने भाषणात सांगितलं की तिला कीर्तन करायला आवडायला लागलंय, मात्र इंदोरीकर महाराजांकडे पाहून अनेक कीर्तनकार तयार झालेत. इंदुरीकर महाराज उच्चशिक्षित असून उद्या परदेशात गेले तर इंग्रजीतूनही प्रवचन देतील.. असे गौरवोद्गार सत्यजित तांबे यांनी काढले.