अहमदनगर : शाळेत असताना आवडत्या नेत्याला पत्र, शिक्षकाला पत्र, मित्राला पत्र आपण सर्वांनीच लिहिलं असेल मात्र नगर तालुक्यातील पारगाव भातोडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा बांधण्यासाठी थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. 

पारगाव भातोडी येथील जिल्हा परिषदेची शाळा 1954 मध्ये बांधण्यात आलेल्या या  शाळेची इमारत मोडकळीस आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही इमारत पाडण्यात आली आहे. त्यामुळे सध्या जिल्हा परिषदेची शाळा ही गावातील मंदिरात भरत आहे. शाळा मंदिरात भरत असल्याने मुलांच्या शिक्षणात अनेकदा व्यत्यय निर्माण होतोय. त्यामुळे आपल्याला शाळेची चांगली इमारत असावी आणि त्यासाठी लवकरात लवकर मान्यता मिळावी म्हणून पारगावच्या चिमुकल्यांनी थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय.

 शाळेच्या इमारतीबाबत ग्रामपंचायतने वारंवार जिल्हा परिषदेकडे मागणी केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान सध्या शाळेचे पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग हे एकाच ठिकाणी भरत असल्याने विद्यार्थ्यांना अध्ययनात अडचणी येत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यातच मोकळ्या जागेत वर्ग भरत असल्याने मुले आजारी पडत असल्याचेही पालक सांगतात.

 दरम्यान शाळेच्या इमारतीबाबत ग्रामपंचायत तसेच शाळा प्रशासनाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. प्रशासनाने देखील याची दखल घेतली असून प्रशासनाकडून आम्हाला आवश्यक ते सहकार्य होत असल्याचे शाळेचे शिक्षक नाना गाढवे यांनी सांगितलंय. शाळेच्या इमारतीबाबत प्राथमिक विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना विचारले असता शाळेला इमारत मिळावी यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती त्यांनी दिली. मात्र त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी देखील शाळेच्या इमारतीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून त्यावर लवकरात लवकर निर्णय होईल असं सांगितलंय.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली आहे. जिल्ह्यात इतरही शाळेसाठी जवळपास 800 खोल्यांची आवश्यकता आहे. वर्ग खोल्या नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याने यावर तातडीने निर्णय होणं गरजेचं आहे.