Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहुरीचे (Rahuri) पोलीस निरीक्षक प्रताप दराडे (Pratap Darade) यांच्या बदलीची विधानसभेत घोषणा झाल्यानंतर इथल्या नागरिकांनी त्यांच्या समर्थनार्थ आज चक्काजाम आंदोलन (Agitation) केलं. माजीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure), ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे (Raosaheb Khevare) यांच्यासह रिपाइं आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने या चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले होते. दीड तासांनी हे आंदोलन मागे घेण्यात आलं.


विधानसभेत बोलू दिलं जात नाही म्हणून रस्त्यावर आवाज उठवावा लागतोय : प्राजक्त तनपुरे


राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी या गावात धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणाऱ्या आरोपीला राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पाठीशी घातल्याचा आरोप भाजप आमदार राम सातपुते यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे केला. यानंतर प्रभारी गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या तडकाफडकी बदलीचे आदेश दिले. या बदलीविरोधात आज राहुरीकर एकवटले. त्यांनी अहमदनगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. आम्हाला विधानसभेत बोलू दिलं जातं नसल्याने रस्त्यावर उतरुन आवाज उठवावा लागत असल्याचं वक्तव्य माजी मंत्री तनपुरे यांनी केलं. धर्मांतर होत असेल तर त्याला पाठिंबा देणार नाही मात्र चौकशी करण्याआधी अधिकाऱ्याची बदली करणं आम्हाला मान्य नसल्याचं प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केलं.


कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची बदली होऊ नये म्हणून राहुरीकरांचा रास्ता रोको : रावसाहेब खेवरे 


राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी राहुरीतील गुन्हेगारीवर चांगल्या पद्धतीने आळा बसवला आहे. त्यांनी रोडरोमियोंचा बंदोबस्त करुन गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण केला आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची बदली होऊ नये यासाठी राहुरीकरांनी रास्ता रोको केला असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी दिली आणि सोबतच भाजप आमदार राम सातपुते यांच्यावर टीका केली


दीड तासांनी चक्काजाम आंदोलन मागे, विद्यार्थ्यांना त्रास झाल्याने तनपुरे यांची दिलगिरी 


दरम्यान दीड तासानंतर हे चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आलं. यावेळी आंदोलन सुरु असताना तिथून जाणाऱ्या रुग्णवाहिकेला वाट मोकळी करुन देत माणुसकीचं दर्शन घडवलं. तर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सहलीसाठी निघालेल्या शैक्षणिक बसला आंदोलनात अडकल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला त्याबद्दल बसमध्ये जाऊन दिलगिरी व्यक्त करत संवेदनशीलता दाखवून दिली.


VIDEO : Rahuri Police Inspector Transfer : राहुरीत पोलीस निरीक्षकाच्या तडकाफडकी बदलीविरोधात आंदोलन