Ahmednagar News : अहमदनगर महापालिकेने (Ahmednagar Municipal Corporation) प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (Plaster of Paris) गणेशमूर्ती तयार करणाऱ्या 130 कारखान्यांना नोटीस काढली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मुर्ती तयार न करता पर्यावरणपूरक मूर्ती तयार कराव्यात तीन दिवसांच्या आत गणेश मूर्ती बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पीओपी साहित्याची विल्हेवाट लावावी, तसा साठा आढळून आल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल,असा इशारा मनपाने गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांना दिला आहे.


याबाबत आज अहमदनगर मनपात गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांची मनपा आयुक्त पंकज जावळे (Pankaj Javale) यांच्यासोबत बैठक झाली. गुजरात न्यायालयाचा निकाल, औरंगाबाद खंडपीठाचा निकाल आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी गेल्यावर्षी विधानसभेत पीओपी गणेश मूर्तीला कोणतीही बंदी नाही या केलेल्या निवेदनाचा संदर्भ देत गणेश मूर्तीकारांनी आपले म्हणणे मांडले. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. 


मनपाच्या निर्णयाविरोधात जनआंदोलन उभारणार


केंद्रीय प्रदूषण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या सूचनेनुसार आम्ही संबंधितांना नोटीस बजावल्या आहेत, प्रदूषण मंडळाकडून या सूचना देण्यात आल्यात त्याचे सर्व कारखानदारांनी पालन करावे असं आयुक्त पंकज जावळे यांनी म्हटले आहे. तर मनपाच्या या निर्णयाविरोधात लवकरच जनआंदोलन उभा केलं जाईल, अशी भूमिका गणेश मूर्तीकारांनी घेतली आहे.


 कारखानदारांनी सूचनांचे पालन करावे - मनपा आयुक्त पंकज जावळे


याबाबत मनपा आयुक्त पंकज जावळे म्हणाले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणपूरक मूर्ती तयार कराव्यात, अशा सूचना दिलेल्या आहेत. यानुसार अहमदनगरमधील सर्व गणेश मूर्ती कारखानदारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुचनांबाबत माहिती देण्यासाठी आज बैठक बोलावण्यात आली. माझे सर्वांना आवाहन आहे की, सर्व कारखानदारांनी सूचनांचे पालन करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.  


....तर मूर्तिकारांना आत्महत्या कराव्या लागतील - भरत निंबाळकर


गणेश मूर्तिकार भरत निंबाळकर म्हणाले की, किमान सात साडेसात हजार कारखानदार आणि कारागीर मूर्ती बनवून त्यावर आपल्या उदरनिर्वाह करतात. हा व्यवसाय बंद करण्यात आला तर शेतकऱ्यांसारखी गणेश मूर्तिकारांनाही आत्महत्या कराव्या लागतील. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेत तसेच शेड भाड्याने घेऊन गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे या निर्णयाचा योग्य विचार केला जावा, अशी विनंती त्यांनी यावेळी केली. 


आणखी वाचा 


Ahmednagar News : राज्यात वाळू माफियांचा हैदोस! चक्क पोलीस पथकावर वाळूचा ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न