अहमदनगर:  अहमदनगर लोकसभा निवडणुकीत (Ahmednagar Lok Sabha Election)  मविआ उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke)  यांना विजय मिळाला ते अहमदनगरचे खासदार झाले.मात्र त्यांच्या विजयासाठी मविआतील स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम केले. मात्र आता लोकसभा निवडणुक होताच अहमदनगर विधानसभा निवडणुकीचे वेध मविआतील अनेकांना लागले. त्यामुळे मविआतील नेते आतापासूनच विधानसभेसाठी दावा करतांना दिसत आहेत. यात निलेश लंके यांची भूमिका देखील महत्वाची ठरणार आहे. निलेश लंके (Nilesh Lanke) हे नेमकी कुणाच्या मागे उभा राहणार हे पाहावं लागणार आहे.


अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर लोकसभा निवडणुकीत मविआ उमेदवार निलेश लंके आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या चुरशीची लढाई झाली त्यात निलेश लंके अहमदनगरचे खासदार म्हणून निवडून आले. मात्र त्यांच्या विजयात शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नगरमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. मात्र लोकसभेनंतर आता वेध लागले ते येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे...निलेश लंके यांच्या विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या मविआतील अनेक नेते आता विधानसभेच्या तयारीला लागले आहेत.


विधानसभेसाठी कोण कोण इच्छुक?


अहमदनगर विधानसभा लढवण्यासाठी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष अभिषेक कळमकर इच्छुक आहेत. निलेश लंके यांचा लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले आणि त्या बॅनरवर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या फोटोखाली भावी आमदार म्हणून उल्लेख दिसून आला. त्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे. निलेश लंके यांच्या विजयासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेणारे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे हे देखील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. अहमदनगर शहरात 35 वर्ष नगरसेवक म्हणून काम करताना जनतेची कामे केल्याने जनतेतूनच मी विधानसभा निवडणुक लढवावी अशी मागणी होत असल्याचे बोराटे सांगतात.पक्षाकडे आम्ही मागणी करू मात्र पक्ष प्रमुख जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं बोराटे सांगतात.


अभिषेक कळमकर विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक


अहमदनगर विधानसभेची जागा ही यापूर्वी राष्ट्रवादीकडे होती. राष्ट्रवादीत फूट पडण्याआधी अहमदनगर विधानात विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी विजय मिळवला होता आता संग्राम जगताप हे राष्ट्रवादी अजित पवार गटात म्हणजेच महायुतीत आहेत. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शहर अध्यक्ष अभिषेक कळमकर हे  देखील विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. कळमकर यांनी देखील पक्षाने जबाबदारी दिल्यास आणि विश्वास दर्शवण्यास निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे म्हंटले आहे.


मविआतील एकजूट  विधानसभा निवडणुकीत राहणार का?


एकूणच निलेश लंके यांच्या विजयासाठी जीवाचे रान करणाऱ्या मविआतील सर्वच पक्षातील नेते हे विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. मात्र निलेश लंके नेमकी कुणाला साथ देणार आणि लोकसभेत मविआत जी एकजूट होती ती विधानसभा निवडणुकीत राहणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


हे ही वाचा :


Video: अखेर निलेश लंके इंग्रजीत बोललेच; सुजय विखेंना टोला; शरद पवारांसमोरच तुफान फटकेबाजी