अहमदनगर : अहमदनगरमध्ये काल रात्री उशिरा नाशिक (Nashik) येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकाने तब्बल एक कोटी रुपयांची लाच (Bribe) घेताना सहाय्यक अभियंत्याला अटक केली आहे. याबाबत रात्री उशिरा अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने अहमदनगरमध्ये खळबळ उडाली आहे. 


महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यास अहमदनगर - छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) महामार्गावरील शेंडी बायपास जवळ रात्री उशिरा लाच घेताना अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी अंतर्गत ठेकेदाराने 100 mm व्यासाचे पाईप टाकण्याचे काम केले होते. या कामाच्या बिलाची मागणी ठेकेदाराने केल्यानंतर मागचे बिल आउट वर्डवर घेऊन तत्कालीन अभियंताचे स्वाक्षरी घेण्यासाठी सहाय्यक अभियंता (Assistant Engineer) अमित गायकवाड याने फिर्यादी ठेकेदार याच्याकडे एक कोटी रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानुसार नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान नाशिक प्रतिबंधक (Nashik ACB) विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने सहाय्यक अभियंता गायकवाडला एक कोटी रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. 


दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदाराने नाशिकच्या एसीबी विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर अधीक्षक वालावलकर यांच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. या कारवाईबाबत गोपनीयता बाळगण्यात आली होती. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणांमध्ये तत्कालीन अभियंता गणेश वाघ यांचा देखील 50 टक्के वाटा होता, अशी कबुली अटकेत असलेल्या अमित गायकवाड याने दिल्याची माहिती आहे.


 


काय आहे नेमकं प्रकरण?


छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदार यांनी अहमदनगर येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत 100 एम एम व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते. या कामाचे दोन कोटी 66 लाख 99 हजार 244 रूपयांचे बिल मिळावे, म्हणून सदर बिलांवरती तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या मागील तारखेचे आउटवर्ड करुन त्यावर त्याच्या सह्या घेवुन सदरचे देयक पाठविण्याचे मोबदल्यात गायकवाड याने स्वतःसाठी तसेच वाघ याच्याकरीता या बिलाचे कामाचे व यापुर्वीच्या अदा केलेल्या काही बिलांची बक्षिस म्हणुन एक कोटी रूपये लाचेची मागणी केली. याबाबत शासकीय ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार एसीबी पथकाने सापळा रचत लाच स्वीकारताना गायकवाड यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान आतापर्यंत सर्वात मोठी असल्याचे सांगितले जात आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


ED Bribe Case : भ्रष्टाचाऱ्यांना घाम फोडणाऱ्या ईडीचा अधिकारीच लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात, 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक