अहमदनगर : नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाचे उद्धाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आधीच स्थानिक शिवसेना नेत्यांनी केल्याने नगरमधील राजकारण तापल्याचं दिसूनय येतंय. या पुलाचं काम जवळपास पूर्ण झालं असून तीन किलोमीटर अंतराच्या या उड्डाणपुलाचे 19 नोव्हेंबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार आहे. मात्र त्या आधीच शिवसेना ठाकरे गट आणि भाजप यांच्या श्रेयवाद रंगल्याचे चित्र आहे.
तब्बल 12 ते 13 वर्षांपासून नगरकरांना प्रतिक्षा असलेल्या उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सक्कर चौक ते जीपीओ चौकापर्यंतचा तीन किलोमीटर अंतराचा हा उड्डाणपूल 80 पेक्षा जास्त पिलरवर उभा करण्यात आला आहे. नगर शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच शहरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात सुटण्यासाठी हा पूल महत्वाचा आहे. जिल्ह्याचे खासदार सुजय विखे पाटील आणि शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी नुकतीच या पुलाची पाहणी केली. 19 तारखेला या पुलावर उद्घाटन होईल हे आधी खासदार विखेंनी जाहीर केलं.
पुलाची पाहणी करतेवेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना शिवसेनेचे दिवंगत आमदार अनिल भैय्या राठोड यांचा नामोल्लेख केला नाही. त्यावरून आता शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं दिसून येतंय.
खासदार सुजय विखे पाटील यांनी अनिल भैय्या राठोड यांचा नामोल्लेख न केल्याने शिवसेना ठाकरे गटाने काल सोशल मीडियाच्या माध्यमातून खासदार सुजय विखे पाटील यांना लक्ष्य करत 'खासदार आपण विसरलात का?' असा घणाघात केला. आज पुलाची स्वतंत्र पाहणी केली, यावेळी दिवंगत अनिल भैय्या राठोड याचे चिरंजीव विक्रम राठोड यांनी नारळ फोडून पुलाचे उद्घाटन केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आधीच पुलावर नारळ फोडल्याने राजकारण तापण्याची शक्यता आहे.
एकीकडे पुलाच्या कामावरून श्रेयवाद सुरू असताना काँग्रेस आणि मनसे यांनी हे गलिच्छ राजकारण सुरू असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
उड्डाणपुलावरून श्रेयवाद सुरू असताना दुसरीकडे नगरकरांना केवळ वाहतूक कोंडीपासून सुटका हवी असल्याने त्यांना 19 नोव्हेंबरची प्रतीक्षा आहे. सध्या पुलाच्या कामासाठी कुणी पुढाकार घेतला यावरुन राजकारण तापले असताना भविष्यात या पुलाला कोणाचे नाव द्यायचे यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.