अहमदनगर : जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात सध्या दुष्काळ सदृश्य (Drought) परिस्थिती पाहायला मिळत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे इथला शेतकरी (Farmers) संकटात सापडला आहे. त्यातच शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्धव्यवसाय करतो. मात्र जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाल्याने दूध उत्पादनात (Milk Production) घट झाल्याने दुग्धव्यवसाय देखील अडचणीत सापडला आहे.


अहमदनगरपासून (Ahmednagar News) जवळच असलेले गुंडेगाव (Gundegaon) हे दुग्ध व्यवसायासाठी गुंडेगाव ओळखले जाते. जवळपास 10 हजार लिटरपेक्षाही जास्त गुंडेगावचं दररोजचे दूध संकलन आहे. मात्र मागील दोन ते तीन महिन्यांपासून गुंडेगावमध्ये जनावरांच्या चाराचा प्रश्न गंभीर बनला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून गुंडेगावचे दूध संकलन जवळपास 30 टक्क्यांनी कमी झाले आहे.


गुंडेगावमध्ये दोन महिन्यांपासून चाऱ्याची टंचाई 


अहमदनगर जिल्ह्यात पुढील दीड महिना पुरेल एवढा चारा असल्याचं प्रशासनाकडून सांगितला जात आहे. मात्र गुंडेगावमध्ये दोन महिन्यांपासून चाऱ्याची टंचाई भासत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. 40 ते 50 किलोमीटरवरून चारा विकत आणून जनावरांना जगवण्याची वेळ इथल्या पशुपालकांवर आली आहे. कमी-अधिक प्रमाणात दक्षिण नगर जिल्ह्यात अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळते. 


शेतकरी दुहेरी संकटात


जिथे माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय तिथे जनावरांना चारा आणायचा कुठून अशी परिस्थिती निर्माण झालीये. त्यातच दुधाला भाव नाही आणि पशुखाद्याचेही दर गगनाला भिडलेत. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणारा शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. गुंडेगाव येथील गंगाराम कोतकर हे गौरक्षक म्हणून काम करतात, कोणत्याही मोबदल्याचा विचार न करता 50 हून अधिक देशी गायी ते सांभाळतात. मात्र सध्या चाऱ्यामुळे त्यांना गायी सांभाळणे कठीण झाले आहे.


दोन महिने पुरेल इतका चारा उपलब्ध - राधाकृष्ण विखे पाटील


चारा टंचाईबाबत दुग्ध आणि पशु संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, येणाऱ्या काळात चाऱ्याची टंचाई निर्माण होईल हा विचार करूनच आपण अ‍ॅडव्हान्स प्लॅनिंग केले आहे. आज राज्यभरात दोन महिने पुरेल इतका चारा उपलब्ध आहे. जर चारा डेपो सुरु करावे लागले तर चारा उपलब्ध करून देण्याची शासनाची तयारी आहे. चारा उत्पादनासाठी आपण शेतकऱ्यांना चांगला भाव देतो. त्यामुळे यंदा उत्पन्न चांगले उत्पन्न मिळेल. जिथे पाण्याची उपलब्धता चांगली आहे. तिथल्या शेतकऱ्यांना आपण बियाणे मोफत देतो, चारा उत्पादन करण्यासाठी चारा छावण्या सुरु करण्याची सध्या गरज नाही. तसेच, चारा आयात करण्याचीही गरज नाही, असे त्यांनी म्हटले आहे.


आणखी वाचा 


धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! घोटभर पाण्यासाठी महिलांची भटकंती, नाशिकमधील भीषण वास्तव समोर