Ahmednagar News : अहमदनगरमधील शेवगाव (Shevgaon) येथील भुसार मालाचे व्यापारी गोपीकिसन बलदवा यांच्या राहत्या घरावर आज (23 जून) भल्या पहाटे तीन ते चारच्या दरम्यान चोरट्यांनी दरोडा (Robbery) टाकला. सोबतच या सशस्त्र दरोड्यात दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक महिला जखमी आहे. या दरोड्याच्या निषेधार्थ आज शेवगाव बंद पुकारण्यात आला आहे.

Continues below advertisement

दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू, एक जखमी

शेवगावच्या जैन गल्लीत वास्तव्यास असलेल्या बलदवा कुटुंबियांच्या घरावर आज पहाटे दरोडा पडला. या घटनेत दोन दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत गोपीकिसन बलदवा (वय 55 वर्षे) आणि त्यांची भावजय पुष्पा बलदवा (वय 65 वर्षे) या दोघांचा मृत्यू झाला. तर गोपीकिसन बलदवा यांच्या पत्नी सुनिता बलदवा या दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन पुढील तपास सुरु केला आहे.

दरोडेखोरांनी ऐवज लुटून पोबारा केला

दरोडेखोरांनी डोक्यामध्ये लोखंडी सळईच्या सहाय्याने वार केल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. यात गंभीर जखमी झाल्याने दोघांचा मृत्यू झाला,घरातील काही ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला आहे. बालदवा यांच्या एका मित्राने गावाला जायचे म्हणून काही रक्कम त्यांच्याकडे ठेवण्यासाठी दिली होती, ती देखील चोरांनी नेली. पाळत ठेवून हा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून घटनास्थळावर व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. व्यापाऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. भर पेठेत अशी घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

शेवगावमधील घटनेच्या निषेधार्थ बंदची हाक

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात सातत्याने खून, दरोड्याच्या घटना घडत आहेत. यामुळे पोलीस यंत्रणेवर ताण वाढला आहे. त्यातच आता पुन्हा आज पहाटे शेवगाव शहरात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला. शेवगावमधील या घटनेच्या निषेधार्थ आज शेवगाव शहरात बंदची हाक देण्यात आली आहे. व्यापारी आणि ग्रामस्थांनी ही बंदची हाक दिली असून पोलिसांनी तातडीने घटनेचा छडा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Continues below advertisement

हेही वाचा

Ahmednagar Crime News:  खळबळजनक! पाथर्डीतील माळीबाभुळगाव येथील विहिरीत आढळले चार मृतदेह