Ahmednagar Crime : अहमदनगरच्या सावेडी उपनगरातील एकविरा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना काल (15 जुलै) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. धारदार शस्त्राने वार केल्याने अंकुश चत्तर (Ankush Chattar) गंभीर जखमी झाले आहेत. अंकुश चत्तर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु होतं. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात भाजपा (BJP) नगरसेवक स्वप्नील शिंदे (Swapnil Shinde) यांच्यासह सात ते आठ जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. 


अंकुश चत्तर यांच्यावरील हल्ल्याचं कारण काय?


अहमदनगर (Ahmednagar) शहरात गेल्या काही दिवसांपासून अशा घटना वाढल्या असून यामुळे नगरकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान अंकुश चत्तर यांच्यावर हल्ला नेमकी कोणत्या कारणाने झाला याबाबत पोलीस तपासात माहिती समोर येणार आहे.


दरम्यान पोलीस घटनास्थळाची पाहणी करत असताना त्या ठिकाणी काही अंतरावर असलेली एक चहाची टपरी अज्ञातांनी पेटवून दिली. या घटनेचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती तोफखाना पोलिसांकडून देण्यात आली आहे.


भरबाजारात व्यावसायिकांवर तीन महिन्यांपूर्वी प्राणघातक हल्ला


भरबाजारात दोन व्यापाऱ्यांवर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर शहरात तीन महिन्यांपूर्वी घडली होती. हल्ल्यात दोघेही व्यापारी जखमी झाले होते. दीपक नवलानी आणि प्रणिल बोगावत अशी हल्ला झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. कापड बाजारातील व्यापाऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.


VIDEO : Ahmednagar Crime: अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला



हेही वाचा


Ahmednagar Crime : शेवगावातील जबरी चोरी आणि हत्या प्रकरणातील आरोपी जेरबंद, छत्रपती संभाजीनगरमधून मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या