अहमदनगर: राज्यात सातत्याने होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.  वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने अनेक घरांची पडझड झाली. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील वनकुटे येथे वादळी पावसामुळे पडझड झालेल्या घरांची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. त्यावेळी उघड्यावर आलेले संसार पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निर्देश दिले आणि 24 तासाच्या आत हिरामण बर्डे आणि कचरू वाघ यांना घर मिळालंय.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल वनकुटे येथे नुकसानीचे पाहणी केली असता त्या ठिकाणी हिरामण बर्डे यांच्या घराची पडझड झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर आता 24 तासाच्या आत हिरामण बर्डे आणि कचरू वाघ यांना आता घर तयार करून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे पक्या घरासाठी लागणाऱ्या विटा आणि वाळू हे देखील येऊन पडलेली आहे. त्यामुळे हिरामण बर्डे आणि कचरू वाघ यांना आता पक्के घर मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले.


हातावर पोट असलेल्या आणि मिळेल ते मजुरी काम करणारे हिरामण बर्डे यांचे रविवारी झालेल्या वादळी पावसामुळे राहते घर पडले. दोन दिवस त्यांचा संसार अक्षरशः रस्त्यावर आला होता, मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वनकुटे गावाला भेट दिली आणि या कुटुंबाला तातडीने घराची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. एवढंच काय तर घर बनून झाल्यानंतर थेट मला फोन करा असंही मुख्यमंत्री म्हणाले.


थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश असल्याने प्रशासन कामाला लागले, दुपारी मुख्यमंत्र्यांचे आदेश आणि सायंकाळी पाच वाजता घरासाठी लागणारे साहित्य येऊन पडले. मंगळवारी रात्रीचे 8 वाजेपर्यंत तर घराचे काम अर्ध्यापेक्षा जास्त पूर्ण झाले होते. हिरामण बर्डे आणि कचरु वाघ यांचा शबरी योजनेतून  घरकुलासाठीही प्रस्ताव आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ आश्वासनच दिले नाही तर 24 तास त्याची पूर्तता केली त्यामुळे बर्डे कुटुंबीय आनंदी असल्याचं पाहायला मिळतंय. वनकुटे परिसरात या वादळी पावसाने 21 घरांचे नुकसान झाले आहे, त्या घरांचीही दुरुस्ती व्हावी अशी मागणी सरपंच डॉ. नितीन रांधवन यांनी केलीये. 


पारनेर तालुक्यातील पहिल्यांदाच मुख्यमंत्री आल्याने गावकरी देखील आनंदी होते, त्यातच मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळल्याने त्यांचे वेगळेपण सर्वांनाच भावले.