Ahmednagar Borewell : अहमदनगरच्या (Ahmednagar News) कर्जत तालुक्यातील कोपर्डीत बोअरवेलमध्ये पडल्याने पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. 11 फूट खाली अडकलेल्या मुलाला वाचवण्यासाठी NDRH च्या पाच पथकांनी प्रयत्न केले. मुलाला रात्री उशिरा बोअरवेलबाहेर (Borewell)  काढण्यात यश देखील आले. परंतु चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तब्बल साडे आठ तास हा चिमुकला बोअरवेलमध्ये अडकला होता. 


रात्री अडीचच्या सुमारास मुलाला बाहेर काढण्यात यश पण...


कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे शेतातील बोरवेलमध्ये ऊसतोड कामगाराचा पाच वर्षाचा मुलगा खेळताना सोमवारी (13 मार्च) सायंकाळी सहा वाजता पडला. सागर बुधा बरेला असं या चिमुकल्याचं नाव आहे. रात्री अडीच वाजेपर्यंत त्याला बोअरवेलमधून काढण्यासाठी बचावकार्य सुरु होते. एनडीआरएफच्या पाच पथकाकडून हे बचाव कार्य सुरु होते. बोरवेलच्या 15 फूट खोलीवर हा मुलगा असल्याचे जाणवत होते, त्याला वाचवण्यासाठी समांतर दोन जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करण्यात आले. घटनास्थळी कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपजिल्हा रुग्णालयाची टीम, कर्जत नगरपंचायतचे अग्निशमन दल यांच्यासह महसूल प्रशासन तळ ठोकून होते. मात्र रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मुलाला बाहेर काढण्यात आले, त्यावेळी तो मृत असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.


कुटुंबावर शोककळा 


दरवर्षी हजारो ऊसतोड मजूर परराज्यातून महाराष्ट्रात ऊसतोडणीसाठी येत असतात. त्याप्रमाणे सागरचे कुटुंब देखील रोजगारासाठी आले होते. कोपर्डी येथील संदीप सुद्रिक यांच्या ऊसाच्या शेतात ऊसतोड करणाऱ्या कामगारांचा हा पाच वर्षांचा मुलगा आहे. हे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील आहे. मुलाच्या मृत्युमुळे ऊसतोडीसाठी इथे आलेल्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 


उघड्या बोअरवेलच्या रुपाने मृत्यूची दारे सताड उघडी


बोअरवेलसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून अनेक चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना देशभरात घडल्या आहेत. ग्रामीण भागातच नाही तर शहरातही उघड्या बोअरवेलच्या रुपाने मृत्यूची दारे सताड उघडी आहेत. या खड्ड्यात पडून निष्पाप जीवांचा बळी जाण्याची शक्यता असतानाही प्रशासन मात्र काहीही कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे. पाण्याची समस्या दूर व्हावी म्हणून नागरिक घराशेजारी बोअरवेल घेतात. मात्र पाणी न लागल्याने खड्डा तसाच उघडा ठेवला जातो. हे खड्डे  खोल असतात. रस्ता आणि परिसरातील लहान मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणी असलेले हे बोअरवेल धोकादायक बनले आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


पावसाने झोडपलं, शेतीचं नुकसान; पाणी पातळी वाढल्यानं बोअरवेल ओव्हरफ्लो, बीड-हिंगोलीचा पाणी प्रश्न मिटणार?