Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी जवळील चंद्रपूर गावात धक्कादायक घटना घडली आहे. साठवण तलावात बुडून तीन विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तिघे पायरेन्स IBMA कॉलेजच्या MBA चे विद्यार्थी होते. तलावातील खड्डयांचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. सोबतच्या विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक रहिवासी मदतीसाठी धावले. मात्र तत्पूर्वी तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहीती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

Continues below advertisement

लोणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक गंगाधर जाधव (वय 24, रा. सुरेगाव शिंगणापूर, ता. नेवासा) , प्रवीण प्रभाकर रसाळ (वय 23, रा. रामनगर, छत्रपती संभाजीनगर) , महेश अशोक शिंदे (वय 26, रा. संत ज्ञानेश्वर नगर, छत्रपती संभाजीनगर) अशी मयतांची नावे आहेत. तिघेही MBA च्या दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी असल्याची माहिती मिळत आहे. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लोणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. 

गोंदिया जिल्ह्यात धक्कादायक घटना, वीटभट्टीची भिंत कोसळून 28 वर्षीय मजुराचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू

गोंदिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. गंगाझरी पोलीस ठाण्याअंतर्गत ओझाटोला येथे एका वीटभट्टीची भिंत कोसळून 28 वर्षीय मजुराचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे. नितेश सूरजलाल वघारे असे मृत युवकाचे नाव असून तो गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा येथील रहिवासी होता. वीटा ट्रॅक्टरमध्ये भरत असताना अचानक भट्टी कोसळल्याने हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच गंगाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, वीटभट्टी मालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करत मृताच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी केली आहे.

Continues below advertisement

देवदर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेल्या कारचा भीषण अपघात, माय लेकाचा मृत्यू

 
देवदर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेल्या  पलूस  येथील भोसले कुटुंबीयांच्या कारला  जुनोनी जवळ भीषण अपघात झाला होता. या दुर्दैवी घटनेत संदीप भोसले आणि त्यांच्या मातोश्री यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर कारमधील अन्य सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे. पलूस येथील रहिवासी असलेले संदीप भोसले हे आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसह कारने विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले होते. त्यांची कार जुनी गावाजवळ आली असता, चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने किंवा समोरील वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा भीषण अपघात झाला.