Continues below advertisement


अहिल्यानगर : बायको नांदायला येत नाही म्हणून बापाने आपल्या चार अपत्यांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शिर्डीतील राहता तालुक्यात घडली. कोऱ्हाळे गावच्या शिवारातील एका विहिरीत पाच मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. अरुण काळे (वय 30 वर्ष) याने आपल्या चार मुलांसह आत्महत्या केली.


अरुण काळे हा अहिल्यानगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव या गावात राहायचा. त्याला तीन मुले आणि एक मुलगी होती. घरातील वादामुळे त्याची पत्नी आठ दिवसांपूर्वी त्याला सोडून गेली होती. त्यामुळे अरुण काळेने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली.


चारही मुलांना विहिरीत ढकललं


अरुण काळे याने राहता तालुक्यातील कोऱ्हाळे गावच्या शिवारात हे कृत्य केलं. त्याने रस्त्याच्या बाजूला आपली टू व्हीलर लावल्याचं दिसून आलं. शिवानी अरुण काळे (वय 8 ), प्रेम अरुण काळे (वय 7), वीर अरुण काळे (वय 6) आणि कबीर अरुण काळे (वय 5) अशी मयत मुलांची नावे आहेत. या चौघांना अरुण काळेने पाण्यात ढकलून दिलं. शेवटी स्वतःही हात-पाय बांधून आत्महत्या केली.


दोन मृतदेहांचा शोध सुरू


विहिरीतून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं असून अद्याप दोघांचा शोध सुरू आहे. जवळपास 45 फूट खोल ही विहीर आहे. त्यातच पाऊस पडत असल्याने शोधकार्यात अडथळा येत आहे. एक हात आणि एक पाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत विहिरीत अरुण काळेचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे स्वतःचे हात पाय स्वतः बांधून अरुण काळेने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.



दोन मुलांना आश्रमशाळेतून घरी आणलं अन्...


मृतांपैकी दोन मुलं ही अहिल्यानगरमधील आश्रमशाळेत शिकत होती. 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर अरुण काळे याने त्याच्या या दोन्ही मुलांना आश्रमशाळेतून घरी आणलं. या मुलांना पत्नीच्या माहेरी घेऊन जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत अरुन काळे याने त्याच्या चारही मुलांना ढकलले. आणि नंतर आत्महत्या केली.


पती-पत्नीमधील वादामुळे अख्खं कुटुंब संपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.