अहमदनगर: एका मांजरीचा जीव वाचवताना अहमदनगरमध्ये सहा जण बायोगॅसच्या खड्ड्यात बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नेवासा तालुक्यातील वाकडी परिसरात ही घघटना घडली आहे. याठिकाणी एक मांजर बायोगॅसच्या खड्ड्यात पडली होती. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून एकजण मांजरीला बाहेर काढण्यासाठी बायोगॅसच्या खड्ड्यात (Biogas Pit) उतरला होता. हा खड्डा पूर्णपणे शेणाने भरला होता. मांजरीला वाचवताना हा व्यक्ती खड्ड्यात पडला. ही गोष्ट आजुबाजूच्या लोकांच्या लक्षात येताच ते संबंधित व्यक्तीला वाचवण्यासाठी धावले. मात्र, त्याला वाचवण्याच्या नादात आणखी 5 जण बायोगॅसच्या खड्ड्यात पडले. याठिकाणी असलेल्या 200 फूट खोल विहिरीचे रुपांतर बायोगॅस प्रकल्पात करण्यात आले होते. त्यामुळे या खड्ड्यात बुडालेल्या लोकांना बाहेर काढणे, मोठे आव्हान आहे. या सहा जणांना खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. या घटनेबद्दल समजताच पोलीस आणि तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. 


सध्या बायोगॅसच्या खड्ड्यात बुडालेल्या या सहा जणांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या सहा लोकांच्या प्रकृतीविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हा खड्डा शेणाने भरलेला असल्याने बुडालेल्या लोकांच्या नाकातोंडात शेण गेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. 


बायोगॅस खड्ड्यात बुडालेल्या सहा लोकांची नावे खालीलप्रमाणे 


1. माणिक गोविंद काळे 
2. संदीप माणिक काळे 
3. बबलू अनिल काळे 
4. अनिल बापूराव काळे 
5. बाबासाहेब गायकवाड
6. एक अज्ञात


आणखी वाचा


'या' गावातल्या प्रत्येक घरात मोफत बायोगॅस, वाचा गावाचं कल्याण करणाऱ्या 'गगनदीप'ची गाथा