Shirdi Guru Purnima : शिर्डीतील (Shirdi) साई बाबा मंदिरात (Sai Baba Temple) पार पडलेल्या गुरुपौर्णिमा (Guru Purnima) उत्सावात साईचरणी कोट्यवधीचं दान प्राप्त झालं. उत्सवाच्या तीन दिवसा साई भक्तांनी पाच कोटी 12 लाख रुपयांचं भरभरुन दान दिलं. या उत्सवात तीन लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतलं. भाविकांनी दिलेल्या दानाची आज मोजदाद करण्यात आली. त्यानुसार गुरुपौर्णिमा उत्सवात साई चरणी एकूण 5 कोटी 12 लाख रुपयांचे दान प्राप्त झालं.


भक्तांचं शिर्डीच्या साईंचरणी भरभरुन दान


दानपेटी - 2 कोटी 17 लाख
देणगी काऊंटर - 1 कोटी 59 लाख
ऑनलाईन डोनेशन - 1 कोटी 36 लाख
12 देशांचे 19 लाखांचे परकीय चलन
22 लाख 14 हजारांचे 479 ग्रॅम सोने
3 लाख 22 हजार रुपये किमतीची 6 किलो 800 ग्रॅम चांदी




निर्बंधमुक्त वातावरणात गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न
शिर्डीतील साई मंदिरात 12 ते 14 या काळात तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव  साजरा करणाऱ्यात आला. शेवटच्या दिवशी दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता करण्यात आली. समाधी मंदिरात संस्थानच्‍या विश्‍वस्‍त मिना शेखर कांबळी यांनी सहपरिवार साईबाबांची पाद्यपूजा केली. त्यानंतर काल्याचे किर्तन झाले आणि दहिहंडी फोडून गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता झाली. कोरोनामुळे गेली दोन वर्ष साईभक्तांना उत्सवात सहभागी होता येत नव्हते. मात्र, यावर्षी भाविकांनी भर पावसातही मंदिर परिसरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.


गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त शेकडो पालख्या साईनगरीत
शिर्डीतील साईमंदिरात गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात महाराष्ट्रातून भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल होतात. देश-विदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांना भाविक गुरुस्वरुप मानतात. भारतीय संस्कृतीत गुरुला देवापेक्षा श्रेष्ठ मानलं जातं. हिच भावना मनात ठेवून लाखो भाविक साई दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. गुरुपौर्णिमा निमित्त साई मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात येते. तसेच या निमित्ताने शेकडो पालख्याही साईनगरीत पोहोचतात. एकंदरीतच तीन दिवस शिर्डीतील साईमंदिरात आनंदाचं आणि भक्तीमय वातावरण पाहायला मिळतं.