नागपूर : समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. नागपूर विभागातील 6 जिल्ह्यातील एकुण 70 शासकीय वसतिगृहासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षा करिता शालेय विद्यार्थ्यानी 15 जुलैपर्यंत तर व्यासायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यानी 30 सप्टेबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.
नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्हयातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शालेय विद्यार्थी, इयत्ता दहावी व अकरावी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील इतर शैक्षणिक, व्यवसायीक अभ्यासक्रमातील प्रथम व व्दितीय वर्षांच्या प्रवेशीत विद्यार्थ्याना समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेता येईल. त्याचप्रमाणे, तालुका स्तरावर मुलांमुलींचे शासकीय वसतिगृह येथे इयत्ता आठवी पासुन ते पुढील अभ्यासक्रमांकरिता प्रवेश अर्ज वाटपाबाबतची प्रक्रिया सुरु झालेली आहे.
शालेय विद्यार्थीसाठी 15 जुलै , इयत्ता दहावी व अकरावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थीसाठी 30जुलै, बी.ए./बी.कॉम/बी.एस.सी अश्या बारावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवीका, पदवी आणि एम.ए, एम.कॉम., एम.एस.सी असे पदवी नंतरचे पदव्युत्तर पदवी, पदवीका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसयीक अभ्यासक्रम वगळुन) विद्यार्थी यांच्यासाठी अर्ज करण्याची मुदत ही 24 ऑगस्टपर्यंत आहे तर व्यासायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यानी 30 सप्टेबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून नाश्ता, भोजन, निवासाची सोय, शैक्षणिक साहित्य तसेच निर्वाह भत्ता देण्यात येतो.
विद्यार्थ्यांना ज्या वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल तेथून अर्ज प्राप्त करुन नमुद दिनांकापर्यत आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत. विद्यार्थ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी आपले अर्ज विहीत वेळेत समक्ष परिपूर्ण माहितीसह सबंधित वसतिगृहातच सादर करावेत, अधिक माहितीसाठी संबंधित शासकीय वसतिगृह तसेच सबधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त कार्यालय, समाज कल्याण येथे संपर्क साधावा असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.