Paithan: छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे शिंदे गटाचे खासदार संदिपान भूमरेंच्या होमग्राऊंडवर आहेत. राज्यात सध्या विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पैठणमध्ये मेळावा घेत महायुतीवर तिरकस टोलेबाजी केली. गद्दारी कितीही लोकांनी केली असेल, किती लोकं विकत घेतली असतील, किती खोके, धोके असं म्हणत वाईनची दुकानं घेत फिरतात असं म्हणत भूमरेंसह शिंदे गटातील नेत्यांवर हल्लाबोल केलाय. 


देशात माज, मस्ती चालत नाही


दोन वर्षांपूर्वी गद्दारी झाली होती, तेंव्हा निष्ठा यात्रा काढली होती. असे म्हणत त्यांनी महायुतीवर टीका केली आहे.  लोकसभेची लढाई आपण जिंकल्यासारखीच आहे. या मतदारसंघात जरी आपण हारलो असलो तरी देशात इंडीया आघाडीनं दोनशेहून अधिक जागा जिंकल्या आहेत. हे २४० च्या पुढे जात नाहीत असं मी म्हणलो होतो. ते तिथेच अडकले. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशाच्या निकालांनी दाखवून दिलंय देशात माज, मस्ती चालत नाही. एकच आवाज चालतो तो जनतेचा आवाज आहे. 


जनतेचा आवाज केंद्रात पोचलाय


या दोन महिन्यातच किती फरक पडलाय बघा, आधी हे मोदींचं सरकार म्हणायचे आता एनडीएचं सरकार म्हणायला लागलेत असंही आदित्य ठाकरे म्हणाले. आता एनडीए सरकार किती युटर्न मारत चालले आहेत. याचं कारण एकच आहे, जनतेचा आवाज केंद्रात आणि संसदभवनात पोहोचलाय.  जरी त्यांचं सरकार आपण थांबवलंय, त्यांचे घोडे अडवलेत. 


ताफा अडवत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी 


मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापलेला असताना शहरात आलेल्या नेत्यांना अडवत मराठा आंदोलक घोषणाबाजी करताना दिसत आहेत. धाराशिव जिल्ह्यातही राज ठाकरेंच्या दौऱ्यात मराठा आंदोलकांनी राडा केला होता. त्यानंतरही अनेक नेत्यांच्या दौऱ्यात अशा स्वरूपाची घोषणाबाजी केल्यानंतर आदित्य ठाकरेंचा ताफा पैठणमध्ये मराठा आंदोलकांनी अडवला. एक मराठा लाख मराठा अशा घोषणाबाजी करत मराठा आरक्षण प्रश्न त्यांनी आदित्य ठाकरे यांना निवेदनही दिले. यावेळी मोठा जमाव एकत्रित झाल्याच दिसलं. ताप अडवल्याने शहरात काही वेळ गोंधळाचे वातावरण होते. पण पोलीस बंदोबस्त असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात होती. 


गद्दारांची 50 खोक्यांनंतर प्रगती बघा..


निवडणूकीचे वारे वाहू लागलेत. निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत होते. पण महाराष्ट्राची निवडणूक जाहीर झाली नाही. आपल्याला ते घाबरलेत. महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेल्या निकालाला ते घाबरलेत. छत्रपतींचा महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही. गद्दारी कितीही लोकांनी केली असेल. किती लोकं विकत घेतली असतील. किती खोके धोके. असं म्हणत त्यांनी शिंदे गटातील नेत्यांवर टोलेबाजी केली. ते म्हणाले, तुम्ही प्रगती पाहिली असेल ५० खोक्यानंतर...कोणी ७५ व्या मजल्यावर घर घेतंय, कोणी डिफेंडर गाडी घेतंय कोणी वाईनची दुकानं काढतंय...१२ होती दोन दिवसांनी कमी कशी झाली. असं म्हणत त्यांनी खासदार संदिपान भूमरेंना टोला लगावला.