नवी दिल्ली : सरकारी हवामान खात्यानं यंदाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्याआधीच एका खासगी कंपनीने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. खासगी कंपनीचा पावसाबाबतचा अंदाज बळीराजाला दिलासा देणार आहे. यंदा जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता या वर्तवण्यात आली आहे.
देशातील काही भागांमध्ये 104 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो. मात्र, याला ईशान्य भारतातील राज्य अपवाद असतील, असेही या अंदाजात म्हटलं आहे.
डब्ल्यूआरएमएस (वेदर रिस्क मॅनेजमेंट सर्व्हिसेस) या खासगी कंपनीने हा अंदाज व्यक्त केला आहे. कृषी क्षेत्रातील विविध घटकांचा अभ्यास ही कंपनी करत असते. शिवाय, स्कायमेटप्रमाणेच हवामानाचा अंदाजही वर्तवण्यचां काम ही कंपनी करते. हवामाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या कंपन्यांमधील खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांक डब्ल्यूआरएमएस कंपनीचा लागतो.
विशेष म्हणजे या खासगी कंपनीने जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये किती पाऊस पडेल, याची टक्केवारी प्रसिद्ध केली आहे. शिवाय, प्रत्येक प्रदेशानुसारही पावसाची टक्केवारी जाहीर केलीय. मात्र, जाहीर केलेली अंदाज तंतोतंत खरा ठरेल, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात आलीय. कारण पावसाळ्याला काही महिने बाकी असताना हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
“आम्ही सध्या कोणतीही ठाम अशी आकडेवारी जाहीर करत नाही. मात्र, पावसाबाबत एक साधारण अंदाज व्यक्त करत आहोत.”, असे डब्ल्यूआरएमएसचे हवामान तज्ञ क्रांती प्रसाद यांनी सांगितले.
पावसाळ्यातील चारही महिन्यात (जून ते सप्टेंबर) पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहीलच. मात्र, जून महिन्यात सुरुवातीलच पाऊस अधिक असेल, तर सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा प्रचंड कमी पाऊस असेल. जून महिन्यात दक्षिण, मध्ये आणि ईशान्य भारतात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा अधिक असेल, तर ईशान्य भारतात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस असले, असंही भाकित या कंपनीने वर्तवलं आहे.
या खासगी कंपनीने वर्तवलेला अंदाज देशभरातील शेतकऱ्यांना एक अर्थाने दिलासा देणार आहे. गेल्या दोन वर्षात वरुणराजाने बळीराजाला मोठा धोका दिला आहे. त्यामुळे आधीच वरुणाराजाच्या अनिश्चिततेमुळे कंटाळलेला शेतकरी, या अंदाजामुळे सुखावेल, यात शंका नाही.
भारतातील पावसाचा अंदाज वर्तवणाऱ्या खासगी कंपनीने अमेरिकेतील हवामन यंत्रणा एनओएएच्या मॉडेलचा आधार घेतल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. अल निनोचा प्रभाव कमी होत असल्याने यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.
हवामान अंदाज वर्तवणाऱ्या कंपन्यांमधील डब्ल्यूआरएमएस ही भारतातील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात मोठी खासगी कंपनी आहे. स्कायमेट ही खासगी संस्था कायम हवामानाचा अंदाज वर्तवत असते. मात्र, यात आता डब्ल्यूआरएमएमसनेही पाऊल टाकलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही कंपन्या आंतरराष्ट्रीय हवामान मॉडेल्स आणि स्वत:च्या आकडेवारीनुसार हवामानाचा अंदाज व्यक्त करत असतात.