Hingoli News: एक फोटो क्लिक केला आणि थेट जेलमध्ये रवानगी झाली अशी अवस्था झाली होती नांदेड जिल्ह्यातील वसमत मधील एका तरुणाची. इराणमधील हुकूमशाही राजवटीच्या कारागृहात अडकल्यावर सुटका होणार की नाही, अशी टांगती तलवार डोक्यावर असताना अखेर दोन महिन्यांनी योगेश पांचाळ नावाचा वसमत मधील तरुण मायदेशी परतला आहे. केंद्र सरकारने इराणसोबत सातत्याने पाठपुरवा केला आणि योगेश पांचाळ अखेर इराणच्या कोठडीतून बाहेर येऊ शकला आहे. तब्बल दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या योगेशला बघताच क्षणी कुटुंबियांना आनंदाश्रू आनावर झाले आहे. 


भारतीय दूतावासाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश 


आयात निर्यातच्या व्यवसायाचं विस्तारीकरण व्हावं आणि या व्यवसायाला इराण देशातील तेहरांमध्ये चांगली संधी असल्याची माहिती मिळाल्यानंतर हिंगोलीच्या वसमतमधील योगेश पांचाळ हा 5 डिसेंबर रोजी इराण मध्ये गेला होता.  त्यानंतर सात डिसेंबरपर्यंत पांचाळ यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत होता. परंतु त्यानंतर अचानक पणे योगेश पांचाळचा कुटुंबीयांसोबतचा संपर्क बंद झाला, मोबाईल बंद झाला.  त्यानंतर पांचाळ यांचे कुटुंबीय चांगलेच चिंतेत सापडले होते.  याची माहिती मिळताच हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी भारतीय दूधवास आणि केंद्र शासनाकडे मदतीसाठी पत्रव्यवहार केला होता आणि इराण मधील भारतीय दूतावासाच्या वतीने सुद्धा योगेशला शोधण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. 


 योगेशला पाहताच कुटुंबियांना दाटले आनंदाश्रू 


अखेर भारतातील दूतवासाच्या प्रयत्नानंतर योगेशला काल (4 फेब्रुवारी) मायदेशी म्हणजेच भारत देशामध्ये पाठवण्यात आले आहे.  आज सकाळी योगेशच स्वागत करण्यासाठी कुटुंबीय मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालं होतं.  योगेशला पाहताच कुटुंबीयांना सुद्धा आनंदाश्रू दाटून आले होते. आज सायंकाळी योगेश त्याच्या घरी परत येणार आहे. तेहरांमध्ये नेमकं काय झालं होतं आणि दोन महिने योगेश काय झालं होत हे पुढे काही समजणार आहे.


एक फोटो क्लिक केला आणि व्हॉट्सअप वर पाठवला म्हणून अटक


योगेशची पत्नी श्रद्धा आणि अजित गोपछडे यांनी इराणच्या भारतातील दूतावासाची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण ते दाद देत नव्हते.  मग तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहून हा प्रकार कळवण्यात आला. शेवटी इराणकडून हे कळवण्यात आलं की योगेश जेलमध्ये आहे. योगेशला जेलमध्ये का ठेवलं होतं याचं कारणही चमत्कारिक आहे. फक्त एक फोटो क्लिक केला आणि व्हॉट्सअप वर पाठवला हे कारण देऊन योगेशला अटक झाली होती. मात्र सातत्याने केंद्र सरकारने इराणसोबत पाठपुरवा केला आणि योगेश पांचाळ अखेर इराणच्या कोठडीतून बाहेर येऊ शकला आहे. 


हे ही वाचा