पूर्व विदर्भाच्या धान पट्ट्यात शेतकरी मिरचीचंही उत्पादन घेतात. राजेंद्र गाळे या शेतकऱ्यांपैकीच एक. 6 एकरात मिरचीची लागवड करत त्यांनी लाखोंचा नफा कमावला आहे.
पूर्व विदर्भाचा भाग धान शेतीसाठी प्रसिद्ध आहे. त्यातही भंडारा जिल्ह्याला धानाचं कोठार म्हटलं जातं. मात्र इथले शेतकरी मिरचीचंही मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. भंडारा जिल्ह्यातील राजेंद्र गाळे त्यातीलच एक.
राजेंद्र गाळे यांनी धान शेतीला फाटा देत मिरचीची लागवड केली. गेली ५ वर्ष ते मिरचीचं पीक घेत आहेत. राजेंद्र गाळे यांची मोरगावात 13 एकर शेती आहे. यापैकी ६ एकरात त्यांनी नवजीता आणि प्राईड जातीच्या मिरचीची लागवड केली.
राजेंद्र गाळे यांनी लागवडीसाठी मातीचे बेड तयार करुन त्यावर मल्चिंग पेपर अंथरले. मिरचीला पाणी देण्यासाठी ठिबकची व्यवस्था केली. खतांची मात्राही तज्ञांच्या शिफारशीप्रमाणे दिली. कीड-रोगांपासून संरक्षणासाठी वेळच्या वेळी फवारण्याही घेतल्या. मिरची लागवडीसाठी राजेंद्र गाळे यांना १२ लाखांचा खर्च आलाय.
६ एकरातील हिरव्या मिरचीचं त्यांना ८० टन उत्पादन मिळालं. यावेळी त्यांना सरासरी ३५ ते ४० रुपये किलो असा दर मिळाला. त्यानुसार त्यांना ३० ते ३२ लाखांचं उत्पन्न मिळालंय. यातून खर्च वजा जाता २० लाखांपर्यंतचा निव्वळ नफा मिळाला.
हिरव्या मिरचीची आवक वाढल्यानं सध्या १० ते १२ रुपये किलोचा दर मिळतोय. त्यामानानं लाल मिरचीला चांगला दर मिळतोय. त्यामुळे राजेंद्र गाळे यांनी लाल मिरचीच्या विक्रीचा निर्णय घेतला. लाल मिरचीचं १५ टन उत्पादन मिळण्याची त्यांना आशा आहे. सरासरी २० रुपये प्रति किलोचा दर धरता ३ लाखांचं उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. त्याचं हे उत्पादन पाहता आसपासचे शेतकरीही शेतीला भेट देत आहेत.
मिरचीची लागवड तीनही हंगामात करता येते. बाजारातील तिची मागणीही कमी होत नाही. राजेंद्र गाळे यांनी याच गोष्टींचा विचार करत मिरची लागवडीचा निर्णय घेतला. बाजाराचा अंदाज घेत मिरचीच्या विक्रीचं नियोजन केलं. या नियोजनामुळेच त्यांना आता लाखोंचा नफा मिळतोय.
VIDEO: