नागपूरः जिल्ह्यात सोमवारी प्राप्त अहवालानुसार 67 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. यात शहरातील 57 तर ग्रामीण भागातील 10 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या बाधितांसह जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या 809वर पोहोचली आहे. यापैकी तब्बल 21 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. दिवसेंदिवस रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.


सोमवारी नागपूर जिल्ह्यात 731 जणांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्यात आली. यात ग्रामीण भागात 136 तर शहरात 595 नागरिकांची चाचणी करण्यात आली. दैनंदिन होणाऱ्या चाचण्यांच्या तुलनेत ही संख्या कमी असल्याने यातील बाधितांची टक्केवारी निश्चितच वाढली आहे. तर 150 रुग्णांची रॅपिड अॅन्टीजेन चाचणी करण्यात आली.


21 कोरोना बाधित रुग्णालयात


कोरोना बाधितांना रुग्णालयात भरती करण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सोमवारपर्यंत 21 कोरोना बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. बाधितांपैकी 8 रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 1 रुग्ण मेयोमध्ये, 5 रुग्ण किग्सवे हॉस्पिटलमध्ये, 2 रुग्ण रेल्वे हॉस्पिटलमध्ये, 2 रुग्ण लतामंगेशकर रुग्णालय सीताबर्डी येथे आणि 3 कोरोना बाधितांवर मेडीट्रिना रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोना बाधितांना रुग्णालयात भरती करण्याची गरज पडत असल्याने प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. तर 788 बाधित गृहविलगीकरणात आहेत.


मंगळवारी मनपा केन्द्रांमध्ये केवळ कोव्हिशिल्ड लस उपलब्ध


नागपूर : नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांवर आता दिवसनिहाय वेगवेगळी लस देण्यात येत आहे. त्यामुळे मंगळवारी 12 जुलै रोजी मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर केवळ कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. लस सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत देण्यात येणार आहे. लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. तसेच लस घेण्यासाठी जाताना सोबत नोंदणी केलेला मोबाईल आणि ओळखपत्र बाळगावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेले आहे. मनपा केन्द्रात 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तथा आरोग्य सेवकांना बुस्टर डोज दिल्या जाईल. तसेच 18 ते 59 वर्ष वयोगटातील नागरिकांना खाजगी रुग्णालयात बुस्टर डोज शासकीय दराप्रमाणे दिल्या जाईल.