नवी दिल्ली : एनडीएमध्ये जी फुट पडली आहे ती बरोबर नाही. शिवसेना ही एनडीएमध्ये असली पाहिजे, असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. महाराष्ट्रामध्ये 225 जागा मिळायला पाहिजे होत्या. पण आपापसात दोन्ही पक्षांच्या बंडखोरीमुळे चाळीस-पन्नास जागांचा फटका बसला हे मी बैठकीत सांगितलं, असेही आठवले एबीपी माझाशी बोलताना म्हणाले. बाळासाहेबांना खरी आदरांजली अर्पण करायची असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीला साथ सोडावी, असेही आठवले म्हणाले. मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेचा मुख्यमंत्री पुढच्या वेळी होऊ शकेल. शिवसेनेनं उपमुख्यमंत्रीपद आणि चांगली खाती घेऊन सरकार बनवावे, असेही आठवले म्हणाले.


महाराष्ट्रामध्ये सगळं व्यवस्थित होणार आहे, असे अमिक शाह मला म्हणाले आहेत, असेही आठवले यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात आम्हाला 220 च्या वर जागा यायला हव्या होत्या. भाजपला 120 ते 125 जागा मिळाल्या असत्या तर ही वेळ आली नसती. शिवसेनेची ही भूमिका योग्य नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार बनवणे ही शिवसेनेसाठी घातक आहे. ही बाळासाहेबांना आदरांजली ठरणार नाही.



मुख्यमंत्रीपद देण्याबाबत भाजपकडून आश्वासन दिलेलं नाही, असेही आठवले म्हणाले. काँग्रेस अजूनही शिवसेनेला पाठींबा द्यायला तयार नाही. त्यामुळे शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद घ्यावं आणि सरकारमध्ये समाविष्ट व्हावं, म्हणजे राज्यातील सध्याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष देता येईल, असेही ते म्हणाले.

एनडीएच्या बैठकीत शिवसेनेविषयी चर्चा झाली नाही. मी बैठकीत शिवसेनेला सोबत घेण्याविषयी चर्चा केली, असे आठवले म्हणाले. भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना सरकार आजिबात टिकणार नाही, असेही ते म्हणाले.