फेरीवाल्यांच्या मारहाणीत जखमी झालेले सुशांत माळवदे यांना कांदिवलीच्या ऑस्कर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेणार आहेत. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे माळवदेंच्या भेटीसाठी ऑस्कर रुग्णालयात जातील.
मालाडमध्ये मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना फेरीवाल्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीही झाली. दरम्यान, यावेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र रात्री उशिरा संदीप देशपांडे आणि इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडलं.
मनसेने फेरीवाल्यांविरोधात सुरु केलेल्या आंदोलनामध्ये काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उडी घेतल्यानंतर आता हे प्रकरण चांगलच चिघळलं आहे. संजय निरुपमांनी चिथावणी दिल्याचा आरोप मनसेने केला आहे.
मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसे विभाग अध्यक्षावर हल्ला केल्यानंतर, मनसे कार्यकर्त्यांनी दादरमधल्या फेरीवाल्यांना लक्ष केलं आहे. प्लाझा सिनेमा समोरील फेरीवाल्यांचं सामान मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर फेकून दिलं. तर तिकडे मुलुंडमध्ये देखील मनसेच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना चोप दिला. तसेच त्यांच्या सामानाची तोडफोड केली.