मुंबई : 'ठाकरे' सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर तिन्ही पक्षांतील नाराजांनी हळूहळू डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. शिवसेनेतही मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे. रामदास कदम शिवसेनेच्या नेते पदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याचंही बोललं जात आहे.


रामदास कदम शिवसेनेतील मोठे नेते असून त्यांच्याकडे मंत्रीपदाचा अनुभव आहे. मात्र विश्वासात न घेता नव्या मंत्रिमंडळातून डावलल्याने ते नाराज आहेत, अशी चर्चा आहे. रामदास कदम यांची कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख आहे. रामदास कदम यांच्याप्रमाणे शिवसेनेतील अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं आहे आहे. शिवसेनेतील दिवाकर रावते, दीपक केसरकर, रवींद्र वायकर, प्रताप सारनाईक, तानाजी सावंत, सुनील प्रभू, भास्कर जाधव या नेत्यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे.


बंधू सुनील राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने शिवसेना खासदार संजय राऊत नाराज असल्याचीही चर्चा होती. संजय राऊत मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यालाही अनुपस्थित होते. सुनील राऊत तर आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जात होतं. मात्र आपण नाराज नसल्याचं स्वत: सुनील राऊत यांनी स्पष्ट केलं. परस्पर अशा अफवा पसरवल्या गेल्या असून ही माहिती चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. मी शिवसेना आमदार असलो तरी आधी कडवट शिवसैनिक आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ता आली यासारखी अभिमानाची गोष्ट नाही. मी कोणत्याही कारणाने नाराज असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं सुनील राऊत यांनी स्पष्ट केलं.


शिवसेनेचे मंत्री


आदित्य ठाकरे (मुंबई)
अनिल परब (मुंबई)
उदय सामंत (रत्नागिरी)
गुलाबराव पाटील (जळगाव)
दादा भुसे (मालेगाव, नाशिक)
संजय राठोड (दिग्रस, यवतमाळ)
संदीपान भुमरे (पैठण, औरंगाबाद)
शंकरराव गडाख , नेवासाचे अपक्ष आमदार (नेवासा, अहमदनगर)
अब्दुल सत्तार (राज्यमंत्री) (सिल्लोड, औरंगाबाद)
राजेंद्र पाटील यड्रावकर, अपक्ष आमदार (राज्यमंत्री) (शिरोळ, कोल्हापूर)
शंभूराज देसाई (राज्यमंत्री) (पाटण, सातारा)
बच्चू कडू, अपक्ष आमदार (राज्यमंत्री) (अचलपूर, अमरावती)


VIDEO | हम मांगने वाले नही, हम देने वाले है; संजय राऊत यांचं वक्तव्य