मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध देशभर आंदोलने सुरु आहेत. आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन लोकांना शांततेंचं आवाहन केलं. मोदींच्या या ट्वीटला अभिनेत्री रेणुका शहाणेने रिट्वीट केलं होतं आणि भाजपच्या आयटी सेलला शांत राहण्याचं आणि अफवा न पसरवण्याचं आवाहन करा, असं मोदींना सांगितलं होतं. रेणुका शहाणेंनी घेतलेल्या या भूमिकेमुळे त्या चर्चेत आल्या होत्या. आता पुन्हा एका ट्वीटमुळे एकदा रेणुका शहाणे चर्चेत आल्या आहेत.

एका ट्विटर युजरने अभिनेत्री रेणुका शहाणेंना 'डॅम अॅक्ट्रेस' म्हटलं आहे. त्यानंतर मात्र रेणुका शहाणेंनी या यूजरची शाळा घेतली. यूजरने मंगळवारी म्हटलं की, 'रेणुका तू फक्त एक डॅम अॅक्ट्रेस आहेस.' त्यानंतर रेणुका शहाणेंनी यूजरची चूक सुधारत त्याला प्रत्युत्तर दिलं. त्या म्हणाल्या की, dam (धरण) आणि damn (शुल्लक) या दोन शब्दांमधील अंतर त्याला समजावलं.


रेणुका शहाणे यूजरच्या ट्वीटला उत्तर देताना म्हणाल्या की, 'तुला मला damn (शुल्लक) म्हणायचं आहे का?, कारण dam (धरण) नदीचा प्रवाह रोखण्याचं आणि वीजनिर्मीतीचं कण्यासाठी उपयोगी ठरतं. तुला मला हे dam (धरण) म्हणायचं नव्हतं, बरोबर ना? कारण माझी कितीही इच्छा असली तरीही ते मी होऊ शकत नाही. ते सजीव नसतात. शुल्लक (damn)! मग आता तरी मी तुझं वाक्य दुरुस्त करू शकते का? 'तू शुल्लक (damn)अभिनेत्री आहेस' हे योग्य वाक्य आहे! आणि मी आहे.'

दरम्यान, रेणुका शहाणेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्वीटवर प्रतिक्रीया दिली होती. ज्यामध्ये मोदींनी सर्वांना हिंसक आंदोलनांपासून दूर राहण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं होतं. पंतप्रधानांच्या या ट्वीटला उत्तर देत रेणुका शहाणेंनी मोदींचं हे ट्वीट रिट्वीट केलं होतं. त्या म्हणाल्या की, "सर, तुम्ही कृपया तुमच्या (भाजप) सर्व आयटी सेटला ट्विटर हँडलपासून दूर राहण्याचं आवाहन करा. जास्तीत जास्त अफवा त्यांच्याकडून पसरवल्या जात आहेत. त्यांची जास्तीत जास्त माहिती खोटी आणि भ्रम पसरवणारी असते. ती देशातील शांती, एकात्मतेच्या विरोधात आहे. तुमची आयटी सेल खरी तुकडे-तुकडे गँग आहे. कृपया त्यांना द्वेष पसरवण्यापासून थांबवा." रेणुका शहाणेचं हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपसह हजारो युजर्सनी रेणुका शहाणेचं ट्वीट रिट्वीट केलं आहे.


जामिया मिलिया इस्लामिया आणि अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत म्हटलं की, "देशात शांतता टिकवून ठेवण्याची वेळ आहे. देशात एकता आणि बंधूभाव टिकवायला हवा. मी सर्वांना आवाहन करतो की, सर्वांनी या हिंसक आंदोलनांपासून दूर राहावे. तसेच लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सध्या आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आहे. देशाच्या विकासासाठी, सशक्त लोकशाही टिकवण्यासाठी, उपेक्षित आणि गरिबांच्या विकासासाठी आपण एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे."

संबंधित बातम्या : 

सर, तुमची आयटी सेल खरी तुकडे-तुकडे गँग; रेणुका शहाणेचा मोदींच्या ट्वीटला रिप्लाय