Murder In Agonda Review :  जिथे पर्यटक फिरायला आणि पार्टी करायला जातात असं लोकप्रिय ठिकाण म्हणजे गोवा. गोव्याचं निसर्ग सौंदर्य आणि तेथील संस्कृती ही अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये बघायला मिळते. मर्डर इन अगोंडा या सीरिजमध्ये देखील गोव्याचं निसर्ग सौंदर्य दाखवण्यात आलं आहे. पण या सीरिजचं कथानक एवढं थरारक आहे की, त्या निसर्ग सौंदर्याकडे प्रेक्षकांचे लक्ष देखील जाणार नाही.  या वेब सीरिजचं कथानक हे गोव्यात झालेल्या एका मर्डरवर आधारित आहे. ही कथा एका काल्पनिक मर्डर केसवर आधारित आहे.  माला नावाची एक माहिला तिच्या पतीसोबत आणि मुलीसोबत गोव्यातील एका बंगल्यामध्ये राहात असते. ती एखाद्या राणीसारखं आयुष्य जगत असते. पण मालाच्या कुटुंबामध्ये सतत वाद होत असतात. ख्रिसमस साजरा करण्यासाठी माला ही कुटुंबासोबत डिनरचं आयोजन करते, पण ख्रिसमसच्या रात्रीचं मालाचा खून होतो आणि पोलीस अधिकारी असणाऱ्या संकेत सालेलकरला त्याची पहिली केस मिळते. 


वेब सीरिजमध्ये संकेत सालेलकर नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला मालाच्या खूनाची केस सोपवण्यात येते. या खूनाचा तपास करण्यासाठी संकेत त्याच्या बहिणीची म्हणजेच सरलाची मदत घेतो. सरला ही आधी फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये काम करत असते. पण काही कारणांनं ती कामामधून ब्रेक घेऊन गोव्याला तिच्या घरी परतलेली असते. तिच्यासोबत संकेत हा मालाच्या खूनाची केस सोडवण्याचा प्रयत्न करतो. संकेत आणि सरला हे या मार्डरचे एक-एक पैलू उलगडण्याचा प्रयत्न करतात. या दरम्यान ते कधी मालाच्या मुलीवर तर कधी मालाच्या प्रियकरावर संशय घेतात. 


मालाची मुलगी आणि तिचा पती हे मालाबाबत सर्व माहिती सरला आणि संकेतला देतात. पण तरी देखील सरला आणि संकेत यांना मालाचा खून कोणी केला? या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. यामध्ये सरला ही मालाच्या बंगल्या जवळ राहणाऱ्या तिच्या एका मित्राला भेटते. तो मालाचा बालपणीचा मित्र असतो. मालाबद्दलची माहिती सरलाला देताना मालाचा मित्र एक गौप्यस्फोट करतो. या सर्व गोष्टी घडत असतानाच मालाच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घटना देखील या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. माला आणि सरलाचं वैयक्तिक आयुष्य, मालाच्या खानूचा तपास करण्याचा प्रयत्न करणारा संकेत आणि मालाचं कुटुंब या सर्व गोष्टींवर मर्डर इन अगोंडा या वेब सीरिजचं कथानक आधारित आहे. सरला ही भूमिका साकारणारी श्रिया पिळगावकर आणि तिच्या भावाची भूमिका साकारणारा आसिफ खान या कलाकारानी उत्तम काम केलं आहे. छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या कुब्रा सैतनं देखील या सीरिजमध्ये चांगलं काम केलं आहे. कलाकरांच्या अभिनयामुळे आणि कथानकामुळे ही सीरिज मनावर छाप सोडते.  


हेही वाचा :


Cuttputlli Review : शहरात घडणाऱ्या क्रूर घटनांचा छडा लावण्यासाठी अक्षय कुमार पुन्हा एकदा खाकी वेशात! कसा आहे ‘कटपुतली’?