Stree 2 Movie Review :  'कंटेट इज किंग' असे म्हटले जाते आणि ही बाब सध्या 'स्त्री-2' (Stree 2) या चित्रपटाला लागू होत आहे. 'स्त्री-2' हा या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे.  या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तीरेखा महत्त्वाची असून हे सगळेच नायक आहेत, ही देखील या चित्रपटाची खास बाब आहे. 


चित्रपटाची कथा काय?


चंदेरी गावात स्त्रीनंतर आता सरकटे भूताची दहशत आहे. हा सरकटा भूत मॉडर्न विचारांच्या मुलीला उचलून घेऊन जातो. हा सरकटा भूत कोण आहे, तो असे का करतो, त्याच्यापासून वाचण्यासाठी गावकरी काय करतात? गावकऱ्यांच्या रक्षणासाठी स्त्रीला पुन्हा का यावे लागते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे चित्रपटात मिळतील. 



चित्रपट कसा आहे?


हा एक अप्रतिम चित्रपट आहे. चित्रपट सुरुवातीपासूनच तुमचे मनोरंजन करतो. चित्रपटाचे लेखन अप्रतिम आहे. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणतो. चित्रपटाचा पूर्वाध चांगला आहे. उत्तरार्धात हॉररचा डोस जरा जास्त आहे. पण तिथेही तुम्ही हसू शकता.  हॉरर कॉमेडीचा उत्तम नमुना हा चित्रपट आहे. तुम्ही एका क्षणासाठीही स्क्रिनवरून नजर हटवू शकत नाही.


चित्रपटात फक्त अभिनेता आणि अभिनेत्रीच महत्त्वाचे नसतात. तर, प्रत्येक व्यक्तीरेखा महत्त्वाची असते हे या चित्रपटाने दाखवून दिले आहे. राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराणा आणि अभिषेक बॅनर्जी यांची केमिस्ट्री जबरदस्त जुळून आली आहे.  


कलाकारांचा अभिनय कसा आहे?


राजकुमार राव हा सध्या फॉर्ममध्ये आलेल्या फलंदाजासारखा आहे. त्याने जबरदस्त अभिनय केला आहे. विक्की ही व्यक्तीरेखा प्रभावीपणे साकारली आहे. श्रद्धा कपूरनेही  पुन्हा एकदा अप्रतिम काम केले आहे. तिने व्यक्तीरेखेला पूर्णपणे न्याय दिला आहे. पंकज त्रिपाठी यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. त्यांचे कॉमेडीचे टायमिंग जबरदस्त आहे. अपारशक्ती खुराणाने ही कमालीचे काम केले आहे. त्याचेही टायमिंग चांगले आहे. अभिषेक बॅनर्जीच्या कामाचे कौतुक करावे लागेल. तमन्ना भाटियादेखील एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तर, एक सुपरस्टार अभिनेता ही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. त्याची भूमिका काय, त्याचा काय संबंध काय हे चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईल. 


दिग्दर्शन कसे आहे?


अमर कौशिकचं दिग्दर्शन खूप चांगलं आहे, त्याने प्रत्येक पात्राचा योग्य वापर केला आहे. तुम्ही कुटुंबासह पाहू शकता असा हॉरर चित्रपट तयार केला आहे. विनाकारण अतिरंजित भयपट नाही. एका क्षणासाठी देखील तुम्हाला कंटाळा येत नाही. निरेन भट्ट यांचे लेखन हा चित्रपटाचा जीव आहे. 


संगीत कसे आहे?


सचिन जिगर यांचे संगीत आणि  वर्गीस यांचे पार्श्वसंगीत दोन्ही अप्रतिम आहे. हॉरर कॉमेडीमध्ये संगीत खूप महत्त्वाची भूमिका बजावते आणि त्यांनीही उत्तम काम केले आहे.