Scoop Web Series Review : मी सिनेमा किंवा वेबसीरिजचा रिव्ह्यू लिहिण्यात तरबेज नाही. पण, माध्यमातील अनेक मित्रांनी आणि मुंबई पोलिसांमधील माझ्या मित्रांनी मुंबईतील ज्येष्ठ पत्रकाराच्या हत्याकांडावर  भाष्य करणाऱ्या 'स्कूप' (Scoop) या वेबसीरिजबद्दल लिहिण्यास सांगितल्यामुळे अखेर मी सीरिजबद्दल लिहिण्याचा घाट घातला आहे. 


जे डे हे मुंबईतील नावाजलेले क्राईम रिपोर्टर होते. मी त्यांचा मित्र असून त्यांच्या हत्येच्या खटल्यात फिर्यादी पक्षाचा साक्षीदार होतो. छोटा राजन असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने मला फोन करून जे डेच्या हत्येबद्दल सांगितलं. 'स्कूप' या वेबसीरिजमधील अनेक व्यक्तिरेखा मला वैयक्तिकरित्या ओळखतात. 


गेल्या रविवारीच मी स्कूप ही वेब सीरिज पाहिली आणि ती मला खूपच मनोरंजक वाटली. छोटा राजन वगळता सीरिजमधील सर्वच पात्रांची नावे बदलण्यात आली आहेत. सीरिजमधील कोणतं पात्र म्हणजे कोणता पत्रकार आहे किंवा कोण कोणाचं प्रतिनिधित्व करत आहेत हे त्याकाळातील माझे सहकारी पत्रकार सहज ओळखू शकतील. पत्रकार जिग्ना वोरा यांच्या पुस्तकारावर आधारित 'स्कूप' ही सीरिज आहे. सीरिजमध्ये जागृती पाठक नावाची क्राईम रिपोर्टर दाखवण्यात आली आहे. 


'स्कूप' ही सीरिज प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करणारी आहे. जून 2011 मध्ये संपूर्ण भारतात खळबळ माजवलेल्या जे डे हत्याकांडावर बेतलेली ही सीरिज आहे. ही सीरिज सत्यघटनेवर आधारित असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण या सीरिजमध्ये सत्य घटनांसोबत काल्पनिक गोष्टींची सांगड घालण्यात आली आहे. 


जिग्नाची बाजू या सीरिजमध्ये योग्य पद्धतीने दाखवण्यात आली आहे. जी वास्तवाच्या अगदी जवळ जाणारी आहे. मला विश्वास आहे की, न्यायालयाने तिची निर्दोष मुक्तता केली आहे. क्राईम रिपोर्टर्समधील शत्रुत्व एवढ्या टोकाला जाईल की ते त्यातून हत्या होईल, असा पोलिसांचा सिद्धांत अनाकलनीय आहे. त्या नऊ महिन्यांच्या बदनामीचा जिग्नाला मोठा फटका बसला आहे. 'स्कूप' सीरिजमध्ये ट्विस्ट येतं आणि ते जे डेच्या हत्येमागचा शोध घेतं तेव्हा कथानक नॉन-फिक्शनकडे झुकतं. 


'स्कूप' या सीरिजमध्ये अनेक महत्त्वाच्या घटना हाताळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एका माजी एटीएस प्रमुखाचे दाऊदशी संबंध होते आणि जे डे हे दाऊद आणि मुंबई पोलिसांच्या संबंधाचा पर्दाफाश करणार होते. सीरिजमधील नायिका जागृती पाठकचा बॉस इम्रान सिद्दीकी हा फक्त पत्रकारितेचा प्रतिक आहे हे सीरिजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे हे मला खूपच मनोरंजनात्मक वाटत आहे. या सीरिजमधील हे पात्र वास्तविक जीवनातील पत्रकारापासून प्रेरित आहे.  


'स्कूप' ही सीरिज सांगते की, 2005 साली भारतीय गुप्तचर संस्थांनी छोटा राजन टोळीतील दोन नेमबाजांच्या मदतीने दाऊदला संपवण्याची योजना आखली होती. या मिशनदरम्यान दिल्लीत एका टॉप स्पायमास्टरला भेटत असताना मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली. सीरिजमध्ये ज्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे तो चुकीचा आहे. ही घटना वगळता सीरिजमधील बाकी सर्व गोष्टी सत्य आहेत. त्यावेळी दिल्लीतील मुंबई पोलिसांच्या टीमचे नेतृत्व एका डीसीपी रँकच्या अधिकाऱ्याने केले होते. तर सीरिजमध्ये दाखवलेला अधिकारी त्यावेळेस अतिरिक्त आयुक्त दर्जाचा दाखवण्यात आला आहे. 


'स्कूप'ची निर्मिती करताना निर्मात्यांनी मुंबईच्या उत्सवांचा किंवा साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांचा आणखी थोडा अभ्यास करायला हवा होता. गणेश चतुर्थी हा दिवस गणेशोत्सवाचा पहिला दिवस असतो, तो या सीरिजमध्ये शेवटचा दिवस असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्या दिवशी लालबागच्या राजाचं दर्शन भाविकांसाठी सुरू होतं. असं असलं तरी या ज्या काही चुका झाल्या आहेत त्या दुर्लक्षित करण्याजोग्या आहेत.