Mirzapur Season 3 Review :    'शुरू मजबूरी में किए थे लेकिन अब मजा आ रहा है.' हा गुड्डू भैय्याच्या तोंडी असलेला संवाद मिर्झापूर वेब सीरिजच्या चाहत्यांना लक्षात असेल. मिर्झापूरचा पहिला सीझन लोकांना प्रचंड आवडला. त्यानंतर दुसरा सीझन आला आणि त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता, तिसरा सीझन आला आहे. पण हा तिसरा सीझन पहिल्या दोन सीझनच्या तुलनेत कमी प्रभावी वाटतो. हा सीझन अली फजलने गाजवला आहे. 


कथा काय?


मुन्ना भैय्या हे जग सोडून गेला आहे. कालिन भैया आता कोमामध्ये आहेत. गुड्डू भैयाकडे आता  मिर्झापूरची सगळी सूत्रे आली आहेत. पण पूर्वांचलचा बाहुबली कोण होणार यावरुन संघर्ष सुरू आहे. शरद शुक्लाला देखील पूर्वांचलची गादी हवी आहे आणि शत्रुघ्नची नजर याच गादीवर आहे. गुंडांच्या टोळीमध्ये हे सगळं सुरू असताना दुसरीकडे राजकीय पटलावरही वेगळं काही सुरू आहे. गुड्डू प पंडितच्या वडिलांनी  एसएसपीच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली असून त्यांच्याविरोधात खटला सुरू आहे.  डिम्पी आणि रॉबिनची प्रेमकहाणीही पुढे सरकते पण सिंहासनावर कोण बसणार, कालिन भैय्याचं काय होणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी सगळ्यांना 'मिर्झापूर'चा तिसरा सीझन  पाहावा लागेल.


कशी आहे वेब सीरिज?


मिर्झापूर या वेब सीरिजने आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. पहिल्या दोन सीझनमुळे तिसऱ्या सीझनची अपेक्षा वाढली. पण तिसऱ्या सीझनचा जोर काहीसा कमी पडला असल्याचे दिसते. सीरिज लांबवल्यासारखी वाटते. हिंसक दृष्ये कमी आहेत. पण, काही दृष्ये ही अंगावर काटा आणणारी आहेत. मुन्ना भैय्याची उणीव नक्कीच भासते. कालीन भैय्याही काहीसा शांत दिसतो. काही सीन्स मजेदार  आहेत. काही दृष्ये तुम्हाला हादरवण्याचा प्रयत्न करतात.


मिर्झापूरच्या या सीझनकडून खूप अपेक्षा होती. ही सीरिज चांगली आहे पण शानदार, जबरदस्त नाही. ही वेब सीरिज गुड्डू भैय्याने एकट्याने सांभाळली आहे. पण,सगळेच 10 एपिसोड तो एकट्याने सांभाळू शकत नाही, हे तितकंच सत्य आहे. 


कलाकारांचा अभिनय - 


अली फजलने गुड्डी भैय्याच्या व्यक्तिरेखेत जीव आणला आहे. तो ज्या पद्धतीने लोकांना मारतो आणि हादरवून सोडतो.  यावेळी त्याने वेगळ्या प्रकारचे इमोशन दाखवले आहे. हा सीझन अली फजलच्या खांद्यावर आहे आणि अलीने गुड्डी भैय्याची भूमिका पूर्णपणे साकारली आहे. 


पंकज त्रिपाठीने आपल्या वाट्याला आलेल्या सीन्समध्ये चांगले काम केले आहे. पंकज त्रिपाठी फार कमी वेळेस स्क्रिनवर दिसतो. रसिका दुग्गलने बीना भाभीची व्यक्तीरेखा साकारताना त्यात रंग भरले आहेत. विजय वर्माचा अभिनय ठिक-ठाक वाटतो. मागील सीझनपासून ते या सीझनपर्यंतच्या दरम्यानच्या काळात विजयने इंडस्ट्रीत ज्या अपेक्षा वाढवल्या आहेत, त्यामुळे त्याचे काम साधारण वाटू शकते. त्याची अभिनय क्षमता बाहेर यावी असा त्याची भूमिका लिहिली गेली नाही असे वाटते.


श्वेता त्रिपाठी शर्माने गोलूची भूमिका छान साकारली आहे. गुड्डू भैय्याची खास विश्वासू व्यक्ती म्हणून ती आपल्याला दिसते. राजेश तैलंग यांनी आपले काम चोख बजावले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत ईशा तलवारने चांगले काम केले आहे. तर, दद्दा त्यागीच्या भूमिकेत लिलीपुटने यंदाही भाव मारला आहे. 


दिग्दर्शन कसे आहे?


- गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर यांनी या शोचे दिग्दर्शन केले आहे आणि त्यांचे दिग्दर्शन उत्तम आहे. त्यांच्याकडून अधिक चांगली अपेक्षा होती. मिर्झापूरच्या या सीरिजमध्ये 'भौकाल'  दिसला नाही. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी काही ट्वीस्ट पेरता आले असते, तडका द्यायला हवा होता. पण तो नाही. मिर्झापूरचे तुम्ही फॅन असाल तर नक्की पाहा.