Tiger 3 Movie Review: टायगरचे (Tiger 3) पहिले दोन्ही भाग प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. सलमान खान (Salman Khan) आणि कॅटरीना कैफची (Katrina Kaif) गुप्तहेरांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. भारतीय गुप्तहेर सलमान खान आणि पाकिस्तानची गुप्तहेर कॅटरीना कैफची पडद्यावरची केमिस्ट्रीही चांगलीच जमली होती. त्यामुळे टायगर 3 ची प्रेक्षक आतुरतरेने वाट पाहात होते. टायगर 3 आधीच्या टायगर फ्रेंचाईजीपेक्षा एक पाऊल पुढे असेल असे वाटत होते. पण...


टायगर 3 ची सुरुवात होते झोया (कॅटरीना कैफ)च्या लहानपणीच्या गोष्टीनं. झोयाचे वडील नसर (आमिर बशीर) पाकिस्तान आयआसआयचे एजंट असतात. नसर आपल्या मुलीला झोयाला बॉक्सिंगचे धडे देत असतात. एका दहशतवादी हल्ल्यात नसर यांचा मृत्यू होतो. त्यानंतर आतिश रहमान (इमरान हाशमी) झोयाला प्रशिक्षण देतो आणि आयएसआय एजंट बनवतो. 


दुसरीकडे कबीर (सलमान खान) पत्नी झोया (कॅटरीना कैफ)सोबत सुखाचा संसार करीत असतो. त्यांना एक मुलगाही असतो. कबीरवर एका भारतीय एजंटची गोपी (रणवीर शौरी)ची सुटका करण्याची जबाबदारी सोपवली जाते. कबीर गोपीची सुटका करतो पण मरताना गोपी कबीरला, पाकिस्तानची एक गुप्तहेर डबल एजंट म्हणून काम करीत असल्याचे सांगतो. आणि त्यानंतर अशी एक घटना घडते ज्यामुळे कबीरला झोयाच डबल एजंट असल्याचा संशय येतो.


दुसरीकडे आतिश रहमानला पाकिस्तानचा पंतप्रधान व्हायचे असते. त्य़ासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधान इराणी (सिमरन) यांची हत्या करण्याची योजना त्याने आखलेली असते. यासाठी तो कबीर आणि झोयाचा वापर करून घेतो. सर्व आळ कबीरवर कसा जाईल याची त्याने योजना आखलेली असते. मात्र, कबीर आतिशच्या सर्व योजना उद्ध्वस्त करतो आणि पाकिस्तानच्या पंतप्रधांनांना वाचवतो. अशी ही टायगर 3 ची कथा.


मात्र कथेत दम नसल्याने चित्रपट पाहाताना प्रेक्षक त्यात गुंगून जात नाही आणि भारत-पाकिस्तानचा मुद्दा असतानाही देशप्रेमाची भावना जागत नाही. भारतीय गुप्तहेर पाकिस्तानच्या पंतप्रधानांना वाचवतो. तेसुद्धा पाकिस्तान त्याचे सासर असल्याने तो यासाठी मदत करण्यास तयार होतो. त्यामुळे ही कथा कशी असेल याची कल्पना प्रेक्षकांना येईलच.


मनीष शर्मा याचे दिग्दर्शन काही खास नाही. चित्रपटाची कथा स्वतः आदित्य चोप्राने लिहिलेली आहे. कथेत काही विशेष नाही. चित्रपट मध्ये मध्ये रेंगाळतो. अॅक्शन दृश्ये बऱ्यापैकी आकर्षक आहेत. 


सलमान खानने कबीरची भूमिका नेहमीप्रमाणेच साकारली आहे. कबीरच्या भूमिकेत त्याने त्याचा स्वॅग दाखवण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने केला आहे. कॅटरीनाने ही झोयाची भूमिका नेहमीप्रमाणेच केली आहे. अॅक्शन दृश्यांमध्ये ती प्रभावित करतो. इमरान हाशमी यात खलनायकाच्या भूमिकेत आहे. परंतु तो खलनायक वाटतच नाही. खलनायकाच्या भूमिकेत तो जराही प्रभावी वाटला नाही.  रॉ हेडच्या भूमिकेत रेवतीने छोटीशी भूमिका साकरली आहे. सलमानच्या सहकाऱ्यांच्या भूमिकांमध्ये कुमुद मिश्रा, आनंद विधात आणि चंद्रचूड राय यांनी बऱ्यापैकी प्रभावित केले आहे.


पठाणमध्ये शाहरुखला टायगर वाचवतो म्हणून टायगर ३ मध्ये कबीरला वाचवायला पठाण येतो. हे दृश्य खूपच लांबवले आहे. प्रीतम याचे संगीत ठीकठाक आहे.


गदरमध्येही पाकिस्तान सनी देओलचे सासर दाखवले आहे. गदरमध्ये प्रथम पत्नीला आणि गदर 2 मध्ये सनी देओल मुलाला वाचवतो. तर टायगर 3 मध्ये सासर असलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांना वाचवतो. त्यामुळे हा टायगर 3 आहे का गदर 3 आहे असा प्रश्न पडतो. सलमान खानचे फॅन टायगर 3 पाहायला जातीलच परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही करामत करून दाखवेल असे वाटत नाही.