मुंबई: सध्या राज्यात आम्ही चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहोत ही वस्तुस्थिती मान्य केलीय, पण कॉग्रेस हा असा शुन्य आहे ज्याच्या जवळ विश्व निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे 2024 सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस हा राज्यात क्रमांक एकचा पक्ष होईल असा विश्वास काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. ते एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात संवाद साधत होते.


असा कोणता क्षण आहे की ज्यावेळी तुम्हाला वाटलं असेल की आपण इथं नको असायला हवं होतं या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले की, "राज्याचे अधिवेशन सुरु होतं, त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे केंद्रातील नव्या कृषी कायद्यावर बोलत होते. त्यावेळी ते जे काही बोलत होते ते सर्व खोटं होतं, पण मी विधानसभा अध्यक्ष असल्याने त्यांचे मुद्दे खोडून काढू शकत नव्हतो. त्यावेळी मला आपण अध्यक्षांच्या खूर्चीत नको तर समोर असायला हवं असं वाटलं. त्यामुळे मी फडणवीसांचे एक-एक मुद्दे खोडून काढू शकलो असतो."


माझा पिंडच शेतकऱ्याचा असून शेतकऱ्याबद्दल कोणी काही चुकीचं बोललं तर मला सहन होत नाही असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. प्रवाहाविरोधात जाणारे नेते अशी ओळख असलेल्या नाना पटोले यांनी 2017 साली भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. सत्तेतल्या भाजप नेतृत्वावर कोणीही बोलायचं धाडस करत नसताना नाना पटोले यांनी मोदींच्या कार्यपद्धतीवरुन थेट त्यांच्यावर टीका केली. मोदींची कार्यपद्धती ही एकाधिकारशाहीची आहे, ते कोणाचं ऐकून न घेत नाहीत असं सांगत त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.


माझा कट्टा | संपूर्ण राम मंदिर निर्मितीसाठी जवळपास 1100 कोटींचा खर्च येण्याची शक्यता : गोविंद देव गिरी महाराज


लोकशाहीत जे सरकार लोकांची कामं करतं ते सरकार बलाढ्य असतं, लोकशाहीमध्ये एकाधिकारशाही चालत नाही असं ते म्हणाले. मी करेन तो कायदा हे अशा पद्धतीचं त्या वेळच्या व्यवस्थेमध्ये चित्र होतं, त्याविरोधात मी आवाज उठवला आणि 2017 साली खासदारकीचा राजीनामा दिला असं नाना पटोले म्हणाले. मी त्यावेळी  जे बोललो ते आता भारतीय जनता भोगत आहे असंही ते म्हणाले.


काँग्रेस असा शुन्य आहे ज्याच्या जवळ विश्वाची निर्मिती करण्याची क्षमता आहे असं सांगत ते म्हणाले की, "गत काळात काँग्रेसकडून काही चुका झाल्या, पक्षाचा सामान्यांशी संपर्क कमी झाला, त्याचा परिणाम पक्ष जनतेपासून दूर होत गेला. पण चढ उतार असणं हे जसं मानवी जीवनाचा भाग आहे, ते पक्षाच्या बाबतीतही लागू होतंय. येत्या काळात जास्तीत जास्त लोकांमध्ये मिसळून काम करणार आणि 2024 सालच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनवणार असा विश्वास आहे."


सेलिब्रेटींनी शेतकरी आंदोलनावर केलेल्या ट्वीटवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, "पूर्वीच्या काळी मुंबईमधील सेलिब्रेटी हे अंडरवर्ल्डच्या दबावाखाली असायचे. आताचे मोदी सरकार त्या सेलिब्रेटींनी तशा प्रकारची वागणूक देतंय का असा प्रश्न पडतोय. आता शेतकरी आंदोलनात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय, ते इतके दिवस आंदोलन करत आहेत. त्यांच्या विरोधात हे सेलिब्रेटी बोलतात हे चुकीचं आहे. सेलिब्रेटींनी त्यांच्या चाकोरीत राहणं गरजेचं आहे."
केंद्र सरकार तीनही कृषी कायदे रद्द करेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार : राकेश टिकैत