मुंबई : तीन कृषी कायदे रद्द करणं आणि एमएसपीसाठी एक कायदा करण्यात यावा. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. आम्ही स्पष्ट केलं आहे की, जोपर्यंत कायदे रद्द केले जात नाही, तोपर्यंत घरवापसी करणार नाही, असं शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले. ते आज एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते.


टिकैत म्हणाले, आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही घरवापसी करणार नाही. 2024 सालापर्यंत आमची आंदोलन करण्याची तयारी आहे. बील रद्द केल्याशिवाय आम्ही कोठे जाणार नाही हे देशातील शेतकरी, छोटे व्यापारी, सामान्य नागरिकांचे हे आंदोलन आहे. हे आंदोलन म्हणजे वैचारिक क्रांती आहे आणि त्याला सत्तेच्या जोरावर दाबण्याचा प्रयत्न करू नका. वैचारीक क्रांती विचारानेच दाबता येते.


हायकोर्ट हे देवासारखं :  राकेश टिकैत 


हायकोर्ट हे देवासारखं असतं त्यामुळे कोर्टाच्या निर्णयावर काही बोलणार नाही. पॉलिसी बनवणं हे सरकारचं काम आहे. चर्चा सुरु असताना त्यात बचावासाठी सुप्रीम कोर्टाला आणल्याचे टिकैत म्हणाले.


केंद्र सरकारनं लागू केलेले तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. शेतकऱ्यांच्या प्रमुख चार मागण्यांपैकी दोन मागण्या सरकारने आधीच मान्य केल्या आहेत. परंतु, शेतकऱ्यांची प्रमुख मागण्या असलेल्या एमएसपीवर लेखी विश्वास आणि तीन नवे कृषी कायदे मागे घेण्याबाबत अद्याप सरकारकडून काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही.


शेतकरी आंदोलनात खलिस्थानी म्हटले जाते मग शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीस का विरोध का दिला जातो, असा सवाल टिकैत यांनी उपस्थित केला. येत्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचालनादरम्यान शेतकरी तिरंग्यासह ट्रॅक्टर संचलनही करणार आहेत, असे टिकैत म्हणाले.


महाराष्ट्रात शेतकऱ्यांना नेता नाही :राकेश टिकैत


महाराष्ट्रात शेतकऱ्यांना नेता नाही. शरद जोशीनंतर महाराष्ट्राला शेतकरी नेताचं लाभला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना महाराष्ट्रात आत्महत्या करावी लागते. जनतेचे काम केले नाही म्हणून जनतेने शरद पवार आणि कॉंग्रेसचे सरकार पाडले.


देशाचे पंतप्रधान खोटं बोलत आहे : राकेश टिकैत


देशाचे पंतप्रधान खोटं बोलत आहे, त्यांच्यावर दबाव आहे. मोदींवर कोणाचा दबाव आहे. ते खोटं बोलतात. आम्हाला शोधायचं आहे की ते खोट का बोलतात. भाजपचे प्रवक्ते मोदींना खोटं बोलायला लावतात.