मुंबई : मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक हॉटेल्सनी ऑफर दिल्या होत्या. मात्र लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्या तोंडावर झोमॅटोने ग्राहकांना खास ऑफर दिली आहे. आगामी पंतप्रधान कोण होणार हे ओळखा आणि कॅशबॅक मिळवा, अशा स्वरुपाची ही ऑफर आहे.

झोमॅटो या फूड डिलीव्हरी कंपनीने 'झोमॅटो इलेक्शन लीग' जाहीर केलं आहे. पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होईल, याबाबत 22 मेपर्यंत ग्राहकांना आपले अंदाज वर्तवण्याची संधी आहे. नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि इतर असे तीन संभाव्य पर्याय देण्यात आले आहेत. 23 मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर अचूक अंदाज वर्तवणाऱ्या ग्राहकांच्या अकाऊण्टमध्ये कॅशबॅक जमा होणार आहे.

अॅपच्या माध्यमातून ऑर्डर नोंदवल्यावर ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. अचूक अंदाज वर्तवणाऱ्या ग्राहकांना 30 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. तर निवडक रेस्टॉरंट्समध्ये अतिरिक्त 40 टक्के डिस्काऊण्टची संधीही ग्राहकांना मिळू शकणार आहे.

विविध वाहिन्या आणि संस्थांच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची शक्यता बहुतांश एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.

झोमॅटोने पहिल्यांदाच अशाप्रकारची ऑफर दिलेली नाही. गेल्याच आठवड्यात झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या वेळीही झोमॅटोने कोणात संघ विजयी ठरेल, याचा अनुमान नोंदवण्यास सांगितलं होतं.