मुंबई : लॉकडाऊनमुळं मुलं घरात अडकून पडली आहेत. खेळायला बाहेर जाणं अवघड होऊन बसल्यानं लहान मुलांना करमणुकीचं साधन म्हणजे टीव्ही आणि मोबाईल. मात्र जास्त टीव्ही आणि मोबाईल पाहणं हे मुलांसाठी अत्यंत धोकादायक आहे. लहान मुलांनी टीव्ही पाहिल्यास त्यांच्या बुद्धीचा विकास मंदावतो, त्यांच्यातील सृजनशीलता कमी होते, असं एका अभ्यासाद्वारे समोर आले आहे. 15 मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त वेळ टीव्हीवर कार्टून पाहणाऱ्या मुलांच्या कल्पनाशक्तीवरही मोठा परिणाम होता. शिवाय, सृजनशीलता संपण्याची भीती असते.


ब्रिटनमधील स्टेफोर्डशायर विश्वविद्यालयाने तीन वर्षांच्या 60 विद्यार्थ्यांचं निरीक्षण केल्यानंतर याबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. स्टेफोर्डशायर विश्वविद्यालयाचे प्रवक्ते सराह रोझ यांनी याबाबत सांगितले की, “15 मिनिटं किंवा त्यापेक्षा अधिक वेळ टीव्ही पाहिल्याने सृजनशीलता संपण्याच्या सुरुवात काही काळाने सुरु होते. शिवाय, पुढे जाऊन मुलांच्या बैद्धिक विकासावरही त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते.” लहान मुलांसाठी टेलिव्हिजन शो बनवणाऱ्या आणि पालकांसाठी हा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे. त्यादृष्टीने टीव्ही शोच्या निर्मात्यांनी आणि पालकांनी आपली पावलं उचलण्याची गरजही बोलली जात आहे. बेलफास्टमध्ये ब्रिटिश सायकॉलॉजिकल डेव्हलपमेंट कॉन्फरन्समध्ये हा अभ्यास सादर करण्यात आला.


अनेकदा मुलांनी शांत बसावं म्हणून काहीजण त्यांच्या हातात स्मार्टफोन देतात. मात्र, मुलांनी शांत बसावं म्हणून स्मार्टफोन देणं भविष्यात धोकादायक ठरु शकतं. एका अभ्यासात असे समोर आले आहे की, चिमुरड्यांच्या हातात स्मार्टफोन देणं म्हणजे कुणाला ड्रग्ज देण्यासारखं आहे.चिमुरड्यांच्या हातात स्मार्टफोन देणं म्हणजे कोकेनसारखे पदार्थ देण्यासारखे आहे आणि अशामुळे मुलांना स्मार्टफोनच्या व्यसनात तुम्ही ढकलत असता, असे या अभ्यासात म्हटलं आहे.


स्मार्टफोन वापरमुळे होणारे नुकसान
स्मार्टफोनवर गेम खेळणारे चिमुरडे आई-वडिलांसोबत खूप कमी वेळ घालवतात.
तंत्रज्ञानाच्या सहवासात आल्यानंतर चिमुरड्यांचा मानसिक विकास नीट होत नाही आणि त्यामुळे बुद्धीवर परिणाम होतो.
स्मार्टफोनवर वेळ घालवणाऱ्या मुलांमधील क्रिएटिव्हिटी कमी होते. त्यामुळे योग्य निर्णय घेणंही त्यांना शक्य होत नाही.
स्मार्टफोन वापरणाऱ्या मुलांची शारीरिक हालचालही कमी होते. त्यामुळे शारीरिक विकासावर परिणाम होतो.
वरील अभ्यासातून हे स्पष्ट होतं की, चिमुरड्यांच्या हातात स्मार्टफोन देणं धोकायदायक ठरु शकतं.