नवी दिल्ली : इंडोनेशियाच्या एका 145 वर्षीय वयोवृद्धाची जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. एफ न्यूज या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सोदीमेजो उर्फ महब गोथो मध्य जावा, असे या सर्वात वयोवृद्धाचे नाव असून ते इंडोनेशियाच्या सरगेन प्रांतातील एका छोट्य़ाशा गावात राहतात. त्यांनी आपले ओळखपत्र दाखवले असता, त्यावर त्यांची जन्म तारीख 31 डिसेंबर 1870 नमुद करण्यात आली होती.


 

सोदीमेजी यांनी डचच्या वसाहतवादी अधिकाऱ्यांना तारुण्यवस्थेत असताना पाहिले आहे. डचचं साम्राज्य जाऊन बराच काळ लोटला, पण तरीही सोदीमेजो आजही जिवंत आहेत. तसेच घराच्या बाहेरील एका चौथऱ्यावर बसून रेडिओ ऐकण्याचा आनंद घेतात.

 

त्यांची ऐकण्याची शक्ती संपल्याने त्यांच्याशी संवाद साधताना अडथळे येतात. त्यांना ऐकू यावे यासाठी, लोकांना त्यांच्याशी मोठ्या आवाजात बोलावं लागतं. तेही अतिशय मंद आवाजात कमी शब्दात प्रतिसाद देतात. सध्या त्यांची दृष्टीही कमी झाली असून त्यांना आवश्यक वस्तू लगेच मिळाव्यात, यासाठी त्या त्यांच्या अतिशय जवळ ठेवल्या जातात.

 

सूर्यतो ही त्यांची 46 वर्षीय नात त्यांचा देखभाल करत असून सध्या ते आपला वृद्धापकाळ त्यांच्या नातींसोबत घालवत असल्याचे ती सांगते. त्यांना दात नसल्याने त्यांना सकस आहार भात, भाजी आदी दिले जाते.

 

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड किंवा इतर कोणत्याही संघटनेकडून त्यांच्या वयाची पडताळणी करण्यात आली नाही.

 

1993 साली त्यांच्या शेवट्च्या पत्नीच्या निधनानंतर, त्यांचेही निधन होईल, अशी अपेक्षा सोदीमेजो यांनी केली असल्याचे सूर्यतो सांगतात. मात्र 23 वर्ष झाले तरी ते जिवंत आहेत.