मुंबई : अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्यास तो रद्द करुन दुसरा कायदा आणावा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. शिवाय,  जातनिहाय आरक्षण कशाला हवं, आर्थिक निकषांवर आरक्षण हंवं, असंही मत यावेळी राज यांनी मांडले आहे. मुंबईतील पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.


 

“गैरवापर होत असल्यास अॅट्रॉसिटी रद्द करा”

“अॅट्रॉसिटीच्या संबंधातून पोलिसांनी शेकडो मुलांना घराबाहेर काढून मारलं. अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्यास तो रद्द करुन त्याऐवजी दुसरा कायदा आणावा.”, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. शिवाय, “अॅट्रॉसिटीविषयी सर्वप्रथम मी बोललो. त्यानंतर शरद पवार बोलले. पण टीका माझ्यावरच झाली”, असेही यावेळी राज म्हणाले.

 

कोपर्डी भेटीच्या वेळी गावकऱ्यांनी अॅट्रॉसिटीच्या दुरुपयोगाच्या तक्रारी केल्या. या दुरुपयोगामुळेच कायद्यात बदल झाला पाहिजे, असे राज म्हणाले. शिवाय, जातीनिहाय धर्मनिहाय कायदे हवेत कशाला? असा सवालही राज यांनी केला.



“आर्थिक निकषांवर आरक्षण हवं”

या मेळाव्यात राज ठाकरेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावरही आपलं मत मांडलं. आरक्षण हे आर्थिक निकषांवरच असायला हवं, अशी मागणी राज ठाकरेंनी केली.

 

“बलात्कार थांबवण्यासाठी शरियतसारखे कायदे हवे”
“बलात्कार थांबवण्यासाठी शरियतसारखे कायदे हवेत, असं बोललो तर चुकीचा अर्थ काढत राज ठाकरेंना शरियत हवा, अशा बातम्या सुरु झाल्या. मात्र बलात्कारासारख्या घटना थांबवायला कठोर कायदा आल्याशिवाय या अशा घटना थांबणार नाहीत.”, असे राज ठाकरे म्हणाले.

 

...म्हणून थंड बसेन असं वाटतंय? : राज ठाकरे
“माझे आमदार निवडून आले नाहीत म्हणून मी थंड बसेन असं वाटतंय? मला काही फरक पडत नाही, आहेत निवडणुका म्हणून लढायच्या. राज्य हातात आलं पाहिजे. निवडणुका येतील, त्या लढवा, पण त्यासाठी आधी आराखडा तयार करा.”