World Rainforest Day 2024 : सध्या मान्सूनचं आगमन सर्वत्र झालंय, पण उन्हाळा बद्दल बोलायचं झालं तर, एप्रिल-मे महिन्यात संपूर्ण जग उष्णतेने होरपळत असल्याचं चित्र दिसलं. मात्र पृथ्वीवरील बहुतांश भाग अजूनही कडक उन्हाने हैराण आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, थंड हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या देश आणि राज्यांमध्येही तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्वांमागील सर्वात मोठे कारण म्हणजे जगात होणारी जंगलतोड, 22 जून हा दिवस जागतिक पर्जन्यवन दिन दरवर्षी साजरा केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का? हा दिवस का साजरा केला जातो? पृथ्वीवर जंगलं असणं इतकं महत्त्वाचं का आहे?


 


संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंगशी झगडतंय


आज पृथ्वीवर शुद्ध पाणी, हवा आणि ऑक्सिजन आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर ते घनदाट जंगलांमुळेच शक्य आहे. त्याचबरोबर जंगलांच्या कमतरतेमुळे संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंगशी झगडत आहे, पण आता तरी मानवाला वेळीच जाग आली पाहिजे, जेणेकरून झाडं-जंगलांचे जतन करून त्याची कत्तल होण्यापासून रोखता येईल. 


 


पर्जन्यवन दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश काय?


मानव आणि प्राण्यांना पृथ्वीवर राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. जगभर असलेल्या पर्जन्यवनांमुळेच ऑक्सिजन आपल्यापर्यंत पोहोचत आहे. जागतिक पर्जन्यवन दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे पर्जन्यवनांचे महत्त्व आणि त्यांच्या संवर्धनाची गरज याबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवणे. पावसाची जंगलं ही पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाची आहे. अनेक प्रकारच्या वनस्पती, प्राणी आणि कीटक येथे आढळतात, त्यांचे जतन करणे पर्यावरण संतुलनासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यांचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी जागतिक पर्जन्यवन दिन साजरा केला जातो. आपल्या पृथ्वीसाठी पर्जन्य जंगले खूप महत्त्वाची आहेत. या दिवसाद्वारे आपण त्यांच्या सुरक्षेसाठी पावले उचलू शकतो. 



जागतिक पर्जन्यवन दिनाची सुरुवात कशी झाली?


जागतिक पर्जन्यवन दिनाचा इतिहास सांगायचा झाला तर, रेनफॉरेस्ट पार्टनरशिप संस्थेने जागतिक पर्जन्यवन दिन साजरा करण्यास सुरुवात केली. 2017 मध्ये प्रथमच जगभरातील बहुतेक देशांमध्ये याला मान्यता मिळाली. अशात, ऑस्टिन, टेक्सास येथील पर्यावरण संस्था रेनफॉरेस्ट पार्टनरशिपने जागतिक कार्यक्रम सुरू केला, तेव्हापासून 22 जून 2017 रोजी पहिला जागतिक पर्जन्यवन दिन साजरा करण्यात आला. पर्जन्यवनांच्या अमूल्य योगदानाबद्दल जनजागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. यानंतर, सर्व क्षेत्रातील लोक आणि संस्थांना एकत्र आणण्यासाठी 2021 मध्ये जागतिक पर्जन्यवन दिन शिखर परिषद सुरू करण्यात आली.


 


ग्लोबल वार्मिंगवर नियंत्रण


वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड शोषून पृथ्वीवरील ऑक्सिजनची पातळी राखण्यासाठी पर्जन्यवन हे हवामान संतुलन आणि ग्लोबल वार्मिंग नियंत्रित करण्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका बजावतात.



जगातील सर्वात मोठे पर्जन्यवन


जगातील सर्वात मोठे रेनफॉरेस्ट ॲमेझॉन आहे. हे 5.5 दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा जास्त, 1.4 अब्ज एकर आहे. ब्राझील, पेरू, कोलंबिया, व्हेनेझुएला, इक्वेडोर, बोलिव्हिया, गयाना, सुरीनाम आणि फ्रेंच गयाना यासह दक्षिण अमेरिकेतील विस्तीर्ण प्रदेश या वनात समाविष्ट आहेत. या पर्जन्यवनांमध्ये औषधी वनस्पती भरपूर आहेत, जे पारंपारिक आणि आधुनिक औषधांमध्ये अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहेत.


 


हेही वाचा>>>


Health : सावधान! शरीरात शांतपणे पसरतो 'हा' प्राणघातक कर्करोग, 'ही' लक्षणं सहज दिसून येत नाहीत, डॉक्टर सांगतात...


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )