World Hemophilia Day 2022 : आज (17 एप्रिल) 'जागतिक हिमोफिलिया दिन'  (World Hemophilia Day 2022) आहे. हिमोफिलिया आणि इतर आनुवंशिक रक्तस्त्राव विकारांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 17 एप्रिल रोजी जागतिक ‘हिमोफिलिया दिवस’ साजरा केला जातो. हिमोफिलिया हा एक असा जीवघेणा आजार आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला दुखापत झाल्यानंतर त्याचे रक्त वाहणे थांबतच नाही. म्हणजेच असा व्यक्तीला किरकोळ दुखापत होऊनही त्याचे रक्त थांबत नाही आणि अतिरक्तस्रावामुळे त्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.

'जागतिक हिमोफिलिया दिन' हा दिवस 1989 मध्ये 'वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलिया'ने सुरू केला. दरवर्षी हा दिवस एका खास थीमसह साजरा केला जातो आणि यावेळी ‘एक्सेस फॉर ऑल’ (Access for All) ही थीम ठेवण्यात आली आहे.

काय आहे हिमोफिलिया?

जेव्हा, कधी एखाद्या व्यक्तीला कुठेतरी दुखापत होते तेव्हा, जखमेतून रक्त वाहू लागते. हे वाहणारे रक्त थांबवण्यासाठी आपल्या शरीरात एक ऑटो सिस्टम आहे. अशावेळी जखमेच्या आजूबाजूला रक्त साठते, त्यामुळे रक्तस्राव काही काळ थांबतो. परंतु, जेव्हा एखादी व्यक्ती हिमोफिलियाने ग्रस्त असते, तेव्हा जखम झाल्यावर त्या व्यक्तीचे रक्त गोठूच शकत नाही आणि सतत रक्तस्त्राव होत असतो.

हिमोफिलिया हा रक्तातील थ्रोम्बोप्लास्टिन किंवा रक्त गोठण्याच्या घटकाच्या कमतरतेमुळे होणारा अनुवांशिक रोग आहे. हिमोफिलिया ही एक गंभीर स्थिती आहे आणि त्यात जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.

या प्राणघातक आजाराची लक्षणे काय?

जर एखाद्या व्यक्तीला हिमोफिलिया हा आजार झाला असेल, तर त्याला थोडासा ओरखडा आला तरी रक्त सतत वाहत राहते. अशा व्यक्तीच्या हाडांच्या सांध्यांमध्ये वेदना कायम राहतात. शरीराच्या कोणत्याही भागात अचानक सूज येते. त्यांना मल किंवा मूत्रात रक्तस्त्राव होतो. शरीरावर निळ्या खुणा येतात. नाकातून रक्त येणे, हिरड्यांमधून रक्त येणे, त्वचेवर सहज ओरखडे येणे अशी अनेक लक्षणे यात दिसतात.

कसा कराल बचाव?

या आजारात जर तुमच्या दात आणि हिरड्यांमधून रक्त येत असेल, तर ताबडतोब दंतवैद्याकडे जा. रक्त पातळ करणारे पदार्थ खाणे टाळा. आहारात जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश करा. रोज व्यायाम आणि योगासने करा. अधिक गंभीर लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :