मुंबई : दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. पर्यावरणाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी या दिवसाचा महत्त्व आहे. मनुष्य आणि पर्यावरण यांचं दिवस अतूट नातं आहे. निसर्गाशिवाय मनुष्य जीवन शक्य नाही. परंतु माणूस आपल्या स्वार्थासाठी पर्यावरणाला हानी पोहोचवत आहे. वृक्षतोड होतेय, समुद्र-नद्या प्रदूषित केल्या जात आहेत. 1972 पासून जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्राने 1972 पासून 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याचं जाहीर केलं. तेव्हापासून दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो.


जागतिक पर्यावरण दिवसाची थीम
दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याची थीम ठरवली जाते. पण यंदा कोरोना व्हायरसमुळे देश लॉकडाऊन असल्याने यावेळी हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. लॉकडाऊनमुळे कारखाने, वाहनांची वाहतूक यासह सगळ्याच गोष्टी बंद असल्याने प्रदूषण आपोआपच काहीसं कमी झालं आहे. त्यामुळे पर्यावरणाबाबत लोकांच्या मनातील चिंताही कमी झाली आहे. त्यामुळे यंदाचा पर्यावरण दिवस मागील वर्षांपेक्षा वेगळा असेल. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, 2020 ची थीम 'वेळ आणि निसर्ग' अशी आहे.


पर्यावरण दिवसाचं महत्त्व
पर्यावरणामुळेच आज मनुष्य, प्राणी-पक्षी, किटक यांचं जीवन शक्य आहे. पर्यावरणाशी संबंधित समस्यांना मानवी चेहरा देण्यासोबतच, लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण व्हावी हा या दिवसामागील उद्देश आहे. लोकांमध्ये पर्यावरणाप्रति जागरुकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे आयोजित केला जाणारा जागतिक पर्यावरण दिवस हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे.


घरात राहून पर्यावरण दिवस साजरा कसा करणार?
- शक्य असल्यास यंदा आपल्या घरातच छोटी रोपं लावा.
- वस्तूंचा फेरवापर करण्याबाबत विचार करा आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही यात सहभागी करा
- पॉलिथिनचा वापर शक्यतो करु नका, त्याऐवजी कापडी पिशव्या वापरा.
- विजेचा कमीत कमी वापर करा.
- घरातील कोणतीही वस्तू फेकण्याआधी तिचा आणखी कोणत्या प्रकारे वापर होईल का हे पाहा.
- रस्त्यावर किंवा इतरत्र थुंकू नका आणि इतरांनाही याबाबत सांगा.
- नव्या पिढीला निसर्ग, पर्यावरण, पाणी तसंच वृक्षांचं महत्त्व समजावून सांगा.