India's First Female Sarpanch with MBA : राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील सोडा गावच्या सरपंच छवी राजावत यांचं सध्या सर्वत्र कौतूक होतंय. छवी यांनी पुण्यातून २००३ मध्ये एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं. दिल्ली आणि जयपूरमधील अनेक कंपन्यांमध्ये सात वर्षे काम केलं. छवि यांनी जेव्हा नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांना महिन्याला एक लाख रुपये पगार मिळत होता. पण त्यांचा सरपंच होण्याचा खरा प्रवास इथूनच सुरु होतो. सध्या त्यांचं वय आहे ४१ वर्षे.

 

छवि यांनी  स्वत:हून सरपंच होण्याचा निर्णय घेतलेला नव्हता. तर गावकऱ्यांनीच त्यांना मावळत्या सरपंचाच्या पत्नीसमोर निवडणूक लढवायला लावली. त्या निवडणुकीत दोन हजारांहून अधिक मतांनी छवी यांचा विजय झाला आणि इथून सोडा गावच्या कायापालट व्हायला सुरुवात झाली.

सरपंच झाल्यानंतर गावातील पाणीटंचाई पूर्ण करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. सरकारकडून कोणतीही मदत नसताना छवी यांनी त्यांचे वडील, आजोबा आणि तीन मित्रांच्या मदतीनं क्राउडफंडिंगद्वारे पैसे उभे केले. श्रमदानासाठी लोकांचं मन वळवून गावातील तलाव खोदून घेतला. दोन दिवसांच्या पावसाने तलाव काठोकाठ भरला आणि गावात पाणी साठवण्यास सुरुवात झाली. छवीने घरोघरी जाऊन गावात कोणती कामे केली पाहिजेत याची माहिती घेतली. गावातील महिलांसाठी गावात स्वच्छतागृह नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळेच त्यांनी तलाव खोदल्यानंतर शौचालय बांधण्याला प्राधान्य दिले.

छवी यांनी गावात 40 रस्ते बांधले. सौरऊर्जेला चालना दिली.सोबतच गावात सेंद्रिय शेतीला चालना देण्यात छवी सध्या गुंतल्या असून त्या स्वतः शेतीही करतात आणि स्वत: ट्रॅक्टरनं शेत नांगरतातही. सोढा गावाची लोकसंख्या १० हजार आहे. 2010 मध्ये जेव्हा त्या पहिल्यांदा सरपंच झाली तेव्हा गावात दुष्काळ, पाणीटंचाई, खराब रस्ते आणि गरिबी अशा समस्या होत्या. आज यापैकी बहुतेक समस्यांचे निराकरण झाल्याचं छवी यांचं म्हणणं आहे.


छवी राजावत यांना सोडा गावात बैसा म्हणूनही ओळखले जाते. सरपंचपद भूषवणाऱ्या त्या सर्वात तरुण व्यक्ती होत्या. छवी याचे आजोबा ब्रिगेडियर रघुबीर सिंगदेखील २० वर्षांपूर्वी याच गावचे सरपंच होते. छवीने पंचायत बैठकींमध्ये महिला पंचांच्या जागी त्यांच्या पतींना सहभागी होण्यापासून पूर्णपणे प्रतिबंधित केले. शिवाय गावकऱ्यांनी महिलांना निवडून दिले तरच कामं करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

 

पंचायतीच्या रडारवरील आणखी एक क्षेत्र म्हणजे गावातील जैवविविधतेसाठी व्यापक वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. सोबतच आमच्या गावात बालविवाह होणार नाहीत याची खबरदारी घेतली असल्याचंही त्यांनी सांगितलं. गावात बँक, एटीएम मशिन आणलं गेलं. एकंदरीतच काय तर राजावत यांच्या सरपंच म्हणून कार्यकाळात सोडा पंचायतीने मूलभूत सुविधा पुरविण्यावर लक्ष केंद्रित केले होतं आणि त्यानंतर आजही त्यांचं काम सुरु आहे.